मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक सेवा देणार्या विविध संस्थांच्या परिसरातील झाडांच्या फांद्या पडून सार्वजनिक सेवेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन, येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सेवा देणार्या मध्य रेल्वे, पिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, मेट्रो, मोनोरेल, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, टाटा पावर व रिलायन्स एनर्जी या ९ संस्थांना त्यांच्या परिसरातील झाडांच्या फांद्या छाटण्याची 'स्थायी परवानगी' पुढील ३ वर्षांसाठी देण्यात आली आहे. परिणामी या परवानगी नुसार आता सार्वजनिक सेवा देणार्या सदर ९ संस्थांना झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी महापालिकेची पूर्व परवानगी घेण्याची गरज नसेल. तथापि, या फांद्या छाटताना झाडांना किंवा झाडाच्या संतुलनाला धोका पोहोचणार नाही, याची परिपूर्ण खबरदारी घेऊन शास्त्रोक्त पद्धतीनेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच फांद्या कापण्यापूर्वी व कापल्यानंतर झाडाची छायाचित्रे घेऊन, त्यासह दर ३ महिन्यांचा अहवाल महापालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. रेल्वेच्या वीज वाहिनीवर किंवा रुळांवर, वीज वितरण कंपन्यांच्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडून रेल्वे वाहतूक विस्कळित होण्याच्या किंवा विद्युत प्रवाह खंडीत होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा घटनांमुळे संबंधित सार्वजनिक सेवांवर प्रतिकूल परिणाम होऊन नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सेवांच्या परिसरातील झाडांच्या मृत किंवा अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या, सार्वजनिक सेवांना अडथळा ठरु शकतील अशा फांद्या, वीज वाहिन्यांच्या दिशेने वाढलेल्या फांद्या किंवा झाडांच्या संतुलनास धोकादायक ठरु शकतील अशा फांद्या कापावयाच्या झाल्यास, त्यासाठी यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, सार्वजनिक सेवांची गरज लक्षात घेता, अशी पूर्व परवानगी प्राप्त करुन घेण्यात कालापव्यय होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सेवा देणार्या ९ संस्थांना झाडांच्या फांद्या कापण्याची स्थायी परवानगी देण्यात आली आहे. तसेच छाटणीची व छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कचर्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधित ९ संस्थांचीच असणार असून त्याची छायाचित्रे देखील महापालिकेकडे सादर होणार्या त्रैमासिक अहवालात असणे आवश्यक आहे. पुढील तीन वर्षांसाठी लागू असलेल्या सदर स्थायी परवानगीनुसार सार्वजनिक सेवेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, अशा फांद्या कापण्यासाठी आता महापालिकेची पूर्व परवानगी घेण्याची गरज सदर ९ संस्थांना लागू नसेल. या ९ संस्थांमध्ये मध्य रेल्वे, पिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, मेट्रो, मोनोरेल, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, टाटा पावर व रिलायन्स एनर्जी यांचा समावेश आहे. तसेच या प्रकारची स्थायी परवानगी ही केवळ झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी आहे. इतर बाबतीत महापालिकेची पूर्व परवानगी घेणे पूर्वीप्रमाणेच बंधनकारक आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणार्या झाडांची / वृक्षांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणार्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.
रेल्वे, बेस्ट, मेट्रो, विमानतळ, महावितरणला फांद्या छाटण्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:31 AM