Mumbai Local: मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असल्यानं चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या मागणीनंही जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबई लोकल संदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे.
ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीपूर्वी ते 'टीव्ही-९' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. आजच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते. त्यासोबतच लोकल प्रवासा संदर्भातही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
"कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकल, बस, एसटी किंवा दुकानं सुरू करण्यासाठीची परवानगी देण्यात यावी या मताचा मी आहे. तशी मानसिकता आमच्या मंत्र्यांचीही आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल", असं अस्लम शेख म्हणाले.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय?शासनाच्या विनंतीनुसारच रेल्वे सुरू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. अशा प्रवाशांना रेल्वे प्रवास करून दिला जात आहे.
दोन डोस पूर्ण केलेल्या प्रवाशांना शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यास रेल्वे प्रवाशांना प्रवास करू दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
"ज्या नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांना प्रवासाची परवानगी द्यायलाच हवी. डब्ल्यूएचओनेही सांगितले आहे की, लसीचे दोन डोस पूर्ण केल्यानंतर ९९ टक्के कोरोनाची बाधा होत नाही. आज अनेक लोकल रिकाम्या जात आहेत. दोन डोस घेतलेले नागरिक कोरोनापासून सुरक्षित असतील तर त्यांना प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही. आज नोकरी, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण तणावाखाली आहेत. सर्व काही अनलॉक करून जर का लोकल बंद राहणार असेल तर अशा अनलॉकचा काहीही फायदा होणार नाही"
- नंदकुमार देशमुख (अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ)