लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :आरेच्या तलावात किमान यावर्षी तरी गणेश विसर्जनाला परवानगी द्यावी, असे पालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी शुक्रवारी आरे दुग्धवसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना पाठविले आहे.
२०२२पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते. मात्र केंद्राच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने आरे दुग्ध वसाहतीमधील संपूर्ण परिसर पर्यावरण व संवेदनशील (इएसझेड) म्हणून जाहीर केल्याने यंदा आरे तलावात गणेश विसर्जन करता येणार नाही, असे पत्र वाकचौरे यांनी सहायक आयुक्त अक्रे यांना पाठविले होते. याबाबत शुक्रवारच्या ‘लोकमत’च्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. आरे तलावात गेली अनेक वर्षे गोरेगाव, मालाड, कांदिवली तसेच इतर ठिकाणांहून गणेशभक्त घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन आरे तलावात करत आहेत. गेल्यावर्षी ३,१०५ घरगुती आणि ३२६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन येथे झाले होते. पालिकेतर्फे दरवर्षी येथे विसर्जनासाठी आवश्यक त्या सुविधा करण्यात येतात. त्या अनुषंगाने याहीवर्षी आवश्यक त्या सुविधा पुरवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे, असे सहायक आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर आरे तलावामध्ये विसर्जन करता येणार नाही हे भक्तांना ऐनवेळी कळविणे शक्य होणार नाही. किंबहुना पालिकेमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तिकेतही आरे तलावाचा विसर्जन स्थळ म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे किमान यावर्षी विसर्जनाला परवानगी द्यावी, अशी विनंती अक्रे यांनी केली आहे.
निर्णयाकडे लक्ष
आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी मिळणार नाही, असे पत्र आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई पालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठविले आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ बदलावा अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. त्यामुळे काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे.