परवाने देता का परवाने?

By admin | Published: September 3, 2016 06:12 AM2016-09-03T06:12:35+5:302016-09-03T06:12:35+5:30

गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाच पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याच्या कारणासह कागदपत्रांच्या

Permits to issue licenses? | परवाने देता का परवाने?

परवाने देता का परवाने?

Next

मुंबई : गणेशोत्सव उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाच पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याच्या कारणासह कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी आणि शुल्काअभावी १ हजार ३१८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रशासनाकडून अद्याप मंडपासंबंधीची परवानगी मिळालेली नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रींच्या प्रतिष्ठापनेकरिता मंडप उभारावा लागतो. हा मंडप उभारताना वाहतूक पोलिसांसह महापालिकेची परवानगी मिळावावी लागते. मागील महिन्याभरापासून मंडपाच्या परवानगीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अद्यापही विविध कारणांमुळे १ हजार ३१८ मंडळे परवान्यांसाठीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबरपर्यंत मंडपासाठीच्या परवान्याकरिता दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या २ हजार १७६ आहे.
यापैकी ४८० मंडळांना मंडपासाठीची परवानगी देण्यात आली आहे. ३७८ मंडळांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या १ हजार १५० एवढी आहे. तर विभागस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या १६८ एवढी आहे.
पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्याच्या कारणासह कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी आणि शुल्काअभावी मंडळांना परवाने मिळण्यात अडचणी उद्भवत आहेत. परिणामी यातून महापालिकेनेच मार्ग काढत मंडळांना दिलासा द्यावा, असे म्हणणे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी या प्रकरणावर मांडले आहे. (प्रतिनिधी)

विनापरवानगी मंडपांवर नगरसेवकांचे ‘मौन’
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी कमी अवधी असल्याने सण, उत्सव राजकीय पक्षांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरणार आहे़ त्यामुळे गल्लोगल्ली सार्वजनिक मंडळांचे मंडप विनापरवानगी थाटले जात असताना नगरसेवक मौनीबाबा बनले आहेत़ प्रत्यक्षात १२ हजारांच्या आसपास मंडळे असताना पालिकेकडे मात्र २० टक्केच मंडळांचे अर्ज आले आहेत़
गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईतील बहुतेक रस्त्यांवर मंडप उभारण्यात आले आहेत़ सजावटीसाठी वेळ मिळावा याकरिता काही मंडळांनी पंधरा दिवस आधीच गणेशमूर्ती मंडपात आणली आहे़ पोलीस आणि पालिकेच्या माध्यमातून हिरवा कंदील मिळत नसल्याने अनेक मंडळे परवानाविनाच उत्सवाच्या तयारीला लागले आहेत़
मुंबईत दरवर्षी सुमारे १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपले मंडप थाटतात़ तंंबूसाठी या मंडळांनी खोदलेले रस्ते भरण्यात येत नाहीत़ तर अनेक ठिकाणी रस्ताच अडविला जातो़ यामुळे वाहतूक, पादचारी यांची गैरसोय होत असते़ या मंडळांना दंड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही़ त्यामुळेच मोठी सार्वजनिक मंडळे पालिकेच्या कारवाईला जुमानत नाहीत.

पोलिसांची परवानगी आवश्यक
पूर्वी सुमारे १० ते १२ हजार मंडळांना सरसकट मंडप बांधण्याची परवानगी मिळत होती़ मात्र गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने पादचारी व वाहतुकीला अडथळा येत असलेल्या मंडळांना परवानगी नाकारण्याचे आदेश दिले आहेत़ वाहतूक व स्थानिक पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतरच पालिकेच्या वॉर्डातून मंजुरी मिळते़ म्हणून वाहतूक पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत सुमारे १ हजार १५० मंडळे खोळंबली आहेत़

एकूण अर्ज - २,१७६
मंडळांना परवानगी - ४८०
मंडळाचे अर्ज बाद - ३७८
पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित अर्ज -१,१५०
विभागस्तरावर प्रलंबित अर्ज -१६८

Web Title: Permits to issue licenses?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.