पर्ससीन, ओएनजीसी सर्व्हेला विरोध
By admin | Published: February 8, 2015 11:05 PM2015-02-08T23:05:39+5:302015-02-08T23:05:39+5:30
समुद्राशी रात्रदिवस झुंज देऊन मासेमारीने उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारीच्या व्यवसाय प्रचंड मंदी आलेली असतानाच
डहाणू : समुद्राशी रात्रदिवस झुंज देऊन मासेमारीने उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारीच्या व्यवसाय प्रचंड मंदी आलेली असतानाच गेल्या एक महिन्यापासून बाहेरील शेकडो पर्ससीन नेट धारकांनी पालघर जिल्ह्याच्या समुद्रात धुमाकूळ घातल्याने शिवाय तेल व नैसर्गिक वायू महामंडळातर्फे भर मासेमारीच्या हंगामात सर्वेक्षण सुरू केल्याने पारंपारीक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ ओढावणार असून या विरोधात आंदोलन करण्यासाठी गावा गावात बैठका सुरू झाल्या आहेत.
मुंबई सारख्या जागतिक महानगरपासून केवळ १२५ कि. मी. अंतरावर डहाणू हे नावाजलेले बंदर आहे. येथील चिंचणी पासून झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर राहणाऱ्या नागरीकांचा मासेमारी हा एकमेव व्यवसाय असून या भागात सुमारे पाचशे ते सहाशे लहान मोठ्या बोटी, कव, वारा व डालदा या तीन पद्धतीने प्रामुख्याने मासेमारी करीत असतात.
विशेष म्हणजे येथील समुद्रात मासेमारीमध्ये घोळ, दाढा, शिवंड, सरंगा, बोंबील, सुरमई इ. मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाची असलेली मासळी सापडले. परंतु गेल्या पाच सहा वर्षापासून समुद्रात मासे मिळेनासे झाले आहेत. शिवाय परदेशी ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपारीक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रातून रिकाम्या हाताने
परतावे लागत असल्याने येथील मच्छीमार कर्जबाजारी झाला आहे. त्यात पर्सीनेटची मासेमारी आणि ओएनजीसीचा सर्व्हे आल्याने या मच्छिमार भूमीपुत्रांवर आत्महत्येची पाळी ओढावणार असल्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)