Join us

जात पडताळणीच्या नावाखाली छळ

By admin | Published: November 11, 2016 3:50 AM

नोव्हेंबर महिना उजाडला, तरी लॉ प्रवेशाचा गोंधळ अजूनही आटोक्यात येत नाही. बुधवारी ५०० आणि हजारांच्या नोटांमुळे प्रवेशास अडचण निर्माण झाली होती

मुंबई : नोव्हेंबर महिना उजाडला, तरी लॉ प्रवेशाचा गोंधळ अजूनही आटोक्यात येत नाही. बुधवारी ५०० आणि हजारांच्या नोटांमुळे प्रवेशास अडचण निर्माण झाली होती, तर आता जात पडताळणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा होणारा छळ उघडकीस आला आहे. विधि अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज नसल्याचा अध्यादेश शासनाने काढला असतानाही, महाविद्यालय मात्र विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर करू, असे लेखी घेत आहे.विधिच्या प्रवेशासंदर्भात रोज नव्या समस्यांची भर पडत आहे. यात भर म्हणून जात पडताळणी प्रमाणपत्राच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जात आहेत. सहा महिन्यांत जात प्रमाणपत्र सादर करू, असे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १०० रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून घेतले जात असून, एका बाँडसाठी विद्यार्थ्यांकडून ३०० ते ३५० रुपये घेतले जात आहेत. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार विधि अभ्यासक्रम ‘प्रोफेशनल’ अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. मात्र, सीईटी सेलच्या निर्देशांचे कारण पुढे करत शासकीय विधि महाविद्यालयासह सर्वच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून ‘सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करू’ असे लिहून घेतले जात आहे. शासनाच्या अध्यादेशात विधि अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले नसले, तरी विधि अभ्यासक्रमांचा समावेश प्रोफेशनल अभ्यासक्रमांमध्ये केला आहे. येत्या काळात प्रवेशासंदर्भात गोंधळ उडू नये, म्हणून विद्यार्थ्यांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बाँड लिहून घ्या, असे निर्देश दिले आहे, असे सीईटी सेलचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)