मुंबई : महापालिकेच्या सायन रुग्णालयात रविवारी दुपारी मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत असल्याचे उघड झाल्यावर एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणात सोमवारी रुग्णालय प्रशासन आणि पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून आपापली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी १० च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एका फोन आला. सायन एसटी स्थानकाजवळ एक इसम बेशुद्धावस्थेत असल्याचे समजले. पोलीस त्या इसमाला घेऊन शीव रुग्णालयात गेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याचा देह शवागृहात नेण्यात आला. पण ती व्यक्ती जिवंत असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णाचे नाव प्रकाश असून पोलिसांनी प्रकाशला आपत्कालीन विभागात दाखल न करता, डॉक्टरला बाहेर बोलवून तपासण्यास सांगितले. पोलीस घाईत होते. आपत्कालीन विभागातील डॉक्टर नवीन होते. प्रकाशच्या नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके खूपच मंद होते. त्याच्या डोळ््यात किडे आढळून आले, ही सर्व मृतदेहाची लक्षणे आहेत. पोलिसांनी घाई केल्यामुळे रुग्णाची लक्षणे पाहून या डॉक्टरने प्रकाशला मृत घोषित केल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची घाई केली नव्हती. पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्याचा दावा केला. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शवविच्छेदनासाठी नेलेली व्यक्ती जिवंत
By admin | Published: October 13, 2015 3:34 AM