केरळचा इसम भीक मागताना मुंबईत सापडला! जुहू पोलिसांनी नातेवाईक शोधले!
By गौरी टेंबकर | Published: March 29, 2023 02:25 PM2023-03-29T14:25:06+5:302023-03-29T14:25:36+5:30
शहरात भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचे नातेवाईक शोधण्यात जुहू पोलिसांना यश मिळाले.
गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरात भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचे नातेवाईक शोधण्यात जुहू पोलिसांना यश मिळाले. सदर व्यक्ती ही केरळची राहणारी असून याप्रकरणी नातेवाईकांनी शोध पथकाचे आभार मानले आहे.
जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी पोलीस ठाणे हद्दीत भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला कारवाईकरिता पोलीस ठाण्यात आणले होते. त्यावेळी मिसिंग पथकातील पोलीस नाईक सुर्वे आणि उपनिरीक्षक आरंगळे यांना सदर इसमाकडे असणाऱ्या एका पिशवीत काही कागदपत्रे सापडली. जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कागदपत्रांवर असणाऱ्या पत्त्यावरून करूनापल्ली, केरळ येथील पोलीस ठाण्याशी त्यांनी संपर्क करून सदर इसमाबाबत माहिती दिली. तेव्हा सदरचा इसम हा तब्बल १ वर्षांपासून घरातून निघून आल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यावर करूनापल्ली पोलीस ठाण्याकडून त्याच्या नातेवाईकांची माहिती आरंगळे आणि सुर्वे यांनी घेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांचा मुलगा सुखरूप असल्याबाबत माहिती दिली. तेव्हा त्याचे वडील नामे राजशेखरण कुटापण (७०) हे २० मार्च रोजी जुहू पोलीस ठाण्यात आले. त्यांचा सविस्तर जवाब नोंद करून अनुप राजशेखरण (३७) यांना सुखरूपपणे वडिलांच्या ताब्यात दिले गेले.त्यावर त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त करून जुहू पोलिस ठाणे आणि पथकाचे विशेष कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"