'वैयक्तिक माहिती खाजगी मालमत्तेइतकी महत्त्वाची!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:12 AM2019-09-25T04:12:58+5:302019-09-25T04:13:04+5:30
एन. के. व्ही. रूपकुमार यांनी लोकमत इन्शुरन्स समिटमध्ये व्यक्त केले मत
मुंबई : विमाक्षेत्र हे देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांत विमा क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे गुंतवणुकीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे या क्षेत्राला घोटाळ्यांचे ग्रहण लागले आहे. या घोटाळ्यांमध्ये वैयक्तिक माहितीचा गैरवापर करताना सर्रास आढळते. त्यामुळे वैयक्तिक माहिती ही एखाद्या खाजगी मालमत्तेइतकी महत्त्वाची असून, तिची जपणूक करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे रिस्क, इन्फॉर्मेशन अॅण्ड सायबर सेक्युरिटी प्रमुख एन. के. व्ही. रूपकुमार यांनी सांगितले.
लोकमत इन्शुरन्स समिटच्या या पहिल्या आवृत्तीस एसबीआय लाइफ - प्रेझेंटिंग पार्टनर, एचडीएफसी लाइफ - पॉवर्ड बाय पार्टनर, एक्सपिरीयन - एनालिटिक्स पार्टनर, श्रीराम जनरल इन्शुरन्स - सपोर्टिंग पार्टनर आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स - सपोर्टिंग पार्टनर यांचा सहभाग लाभला होता.
विमा क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीच्या लढ्याला बळ देण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने मुंबईत ‘लोकमत इन्शुरन्स समिट’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आयआरडीएचे माजी सदस्य नीलेश साठे, स्टार युनियन दाईची लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कुलकर्णी, बजाज आलियान्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव कुमार द्विवेदी, कोटक लाइफ इन्शुरन्सचे चिफ रिस्क आॅफिसर सुनील शर्मा आदी उपस्थित होते.
या वेळी रूपकुमार म्हणाले, बºयाचदा घरात काम करणाºया व्यक्ती, वाहन चालक काम सोडताना अनेक महत्त्वाचे दस्तावेज आपल्यासोबत घेऊन जातात. नंतर त्यांचा गैरवापर केला जातो. एखाद्या कामासाठी माहिती देताना, कागदपत्रे कशासाठी हवे हे सर्व जाणून घ्या. योग्य व्यक्ती असेल तरच त्याकडे द्या; अन्यथा देऊ नका. आपली वैयक्तिक माहिती यामध्ये कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र ही सर्व आपली ‘संपत्ती’ असून तिची जपणूक करायला हवी.
नीलेश साठे म्हणाले, आज सरकारने वाहतूक नियम आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे कित्येक लोक त्यावर टीका करीत आहेत. पण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. एखादा अपघात झाल्यास पीडितास विम्याच्या रकमेतून मदत दिली जाते. भारतातील ४० टक्के वाहनांचा विमा नाही. त्यामुळे वाहन चालकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन विमा करणे आवश्यक आहे.
सुनील शर्मा यांनी सांगितले की, युरोपीय देशात तुम्ही २० वर्षांत किती अँटिबायोटिक्स घेतल्या याची माहिती सरकारी संकेतस्थळावर मिळते. पण आपल्याकडे तसे होत नाही. तसेच अनेकदा रुग्णाला काही आजार असला तरी डॉक्टर आजार नसल्याचे प्रमाणपत्र देतात. आपल्याकडे वैद्यकीय माहितीचा अभाव आहे, त्यामुळेच विमा क्षेत्रात होणाºया घोटाळ्यांना हातभार लागतो.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, विमा क्षेत्रातील घोटाळ्यांमध्ये संघटित गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. काही गुन्ह्यांमध्ये रुग्णालयांचाही सहभाग असतो. उत्तर प्रदेशात एका मृत व्यक्तीचा विमा काढला होता, तर एका घटनेमध्ये जिवंत व्यक्ती मृत दाखविण्याचा प्रयत्न झाला. ग्रामीण भागात वैयक्तिक माहितीची पडताळणी करणे अवघड जाते; त्यामुळे या घटना घडतात, असे त्यांनी सांगितले.
लघू, मध्यम उद्योजक द्विधा मन:स्थितीत
एनपीए वाढल्याने लघू, मध्यम उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकतर त्यांचा माल विकला जात नाही, दुसरीकडे बँका हप्त्यासाठी तगादा लावतात. इन्शुरन्स कंपन्या क्लेम लवकर घेत नाहीत. त्यामुळे अनेक उद्योजक द्विधा मन:स्थितीत आहेत. शेतकऱ्यांप्रमाणे तेही आत्महत्या करण्याची शक्यता आहे, असे एसएमईचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले.