नवी मुंबई : फळांच्या मार्केटमध्ये संत्री, मोसंबी, सफरचंदाप्रमाणे पेरूलाही मागणी वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये दररोज ४० ते ५० टन पेरूची देशाच्या विविध भागांतून आवक होत आहे. मध्यप्रदेशमधील पेरूलाही मागणी वाढत असून, या पेरूचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत असल्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मकर संक्रांतीच्या दरम्यान ग्राहकांकडून पेरूलाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. यामुळे काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पेरूची मागणी वाढली आहे. मध्यप्रदेशातून व्हीएनआर व तैवान प्रकारचा माल विक्रीसाठी येत असून ४० ते ५२ रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री होत आहे. मध्य प्रदेशमधून येणाऱ्या काही पेरूंचे वजन अर्धा ते एक किलो आहे. त्यापेक्षा जास्त वजनाचे पेरूही उपलब्ध होत आहेत. या पेरूला महाराष्ट्रातील पेरूप्रमाणे चव नसली तरीही ग्राहकांकडून पसंती वाढत आहे. सद्यस्थितीमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये हे पेरूही उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील इंदापूर, शिर्डी व इतर ठिकाणांवरूनही माल विक्रीसाठी येत आहे. राज्यातील पेरूचा आकार लहान आहे. आतमध्ये लाल रंग असलेल्यास मागणी वाढत आहे.
मुंबईप्रमाणे राज्यातील औरंगाबाद, जळगाव, पुणे, सोलापूर बाजार समितीमध्येही पेरूची आवक होत आहे. या वर्षी आवक जास्त होत असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नाहीत. यावर्षी ग्राहकांना परवडेल अशा दरामध्ये पेरू उपलब्ध होत आहेत. होलसेल मार्केटमध्ये ४० ते ५२ व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे.मुंबई बाजार समितीमध्ये मध्यप्रदेश, इंदापूर, शिर्डी परिसरातून पेरूची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यावर्षी आवक जास्त असल्यामुळे बाजारभाव नियंत्रणामध्ये असून ग्राहकांना परवडेल अशा दरामध्ये पेरू उपलब्ध होत आहेत. - राहुल कोकाटे, पेरू व्यापारी,मुंबई बाजार समिती