विमानतळावर मानवसेवेची प्रचिती

By Admin | Published: January 26, 2017 03:51 AM2017-01-26T03:51:04+5:302017-01-26T03:51:04+5:30

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री मरणाच्या दारातून एका रुग्णाला वाचवून, एका डॉक्टरने मानवसेवेची प्रचिती दिली.

Perviget of human resources at the airport | विमानतळावर मानवसेवेची प्रचिती

विमानतळावर मानवसेवेची प्रचिती

googlenewsNext

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री मरणाच्या दारातून एका रुग्णाला वाचवून, एका डॉक्टरने मानवसेवेची प्रचिती दिली. ठाण्याच्या भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री पाटणकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
२२ जानेवारी रोजी विमानतळावर रात्री ११.१५ च्या सुमारास ४५ वर्षीय नीलमनी शर्मा यांच्या हृदयाचे ठोके थांबले, तेव्हा दुबईहून परतणाऱ्या ठाण्याच्या भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री पाटणकर यांनी प्रसंगावधान दाखवत, शर्मा यांच्यावर उपचार केले. त्यानंतर, १५ ते २० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर शर्मा यांचे प्राण वाचले आहेत. मुंबईचे रहिवासी असणारे नीलमनी शर्मा रविवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत व्हिएतनाम येथून कार्यालयीन बैठकीतून परतले. त्यानंतर, काहीच तासांनी शर्मा दुसऱ्या विमानाने अहमदाबादला रवाना होणार होते. मात्र, त्याच वेळी अचानक शर्मा यांची तब्येत खालावली आणि त्यांच्या हृदयाचे ठोके थांबले. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनाही नेमके काय करावे, हे सूचत नव्हते. अशा परिस्थितीत त्याच वेळी दुबईहून मुंबईत परतणाऱ्या डॉ. पाटणकर शर्मांच्या मदतीला धावून आल्या. सुरुवातीला डॉक्टरांनी शर्मा यांना सहकाऱ्यांच्या मदतीने जमिनीवर झोपवत प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, शर्मा यांच्या हृदयाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी कार्डिअ‍ॅक मसाज केला. मात्र, फारसा प्रतिसाद न आल्याने, विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वैद्यकीय साहित्याची जमवाजमव केली. त्यानंतर, रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी शर्मा यांच्या पायाखाली सुटकेस ठेऊन पुढील उपचार केले. त्याप्रसंगी, घसा आणि स्वरयंत्राची तपासणी केली. त्यानंतर, तीनदा इलेक्ट्रॉनिक शॉक दिल्यानंतर, अखेर रुग्णाची श्वसनक्रिया पुन्हा सुरू झाली.
डॉक्टरांच्या उपचारास रुग्णाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शर्मा यांच्या सहकाऱ्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर, त्वरित शर्मा यांना व्हेंटिलेटरवर ठेवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या हृदयात तीन ब्लॉक असल्याचे निदान झाले. शर्मा यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ.पाटणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तातडीची अशी एखादी परिस्थिती निर्माण झाल्यास, ३ ते ५ मिनिटांत प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते, असे डॉ.पाटणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Perviget of human resources at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.