खड्ड्यांवरील पेव्हरब्लॉक जीवघेणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:49 AM2018-07-18T02:49:52+5:302018-07-18T02:49:56+5:30
खड्डे भरण्याची मुदत संपल्यानंतरही मुंबईतील विविध भागांत खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे.
- खलील गिरकर
मुंबई : खड्डे भरण्याची मुदत संपल्यानंतरही मुंबईतील विविध भागांत खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. मुंबईच्या वेशीजवळ असलेल्या नाहूर, भांडुप परिसरातील रस्त्यांवरदेखील खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले असून, त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर केला गेल्याने, नागरिकांच्या हालात आणखी भर पडली आहे.
नाहूर रेल्वे स्थानकाकडून भांडुपच्या दिशेने निघाल्यावर रस्त्यांवरील खड्डे आपले लक्ष वेधून घेतात. खड्ड्यांबाबत ओरड वाढल्यानंतर या परिसरातील खड्ड्यांना बुजविण्याचा प्रयोग करण्यात आला. विशेष म्हणजे, अत्याधुनिक पद्धतीने खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा देण्याएवजी, स्वस्तातला उपाय म्हणून पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्यात आले आहेत. कहर म्हणजे नाहूर रेल्वे स्थानकाकडून भांडुपच्या दिशेने जाणाऱ्या उताराच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याऐवजी त्या ठिकाणी केवळ पेव्हर ब्लॉक ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
लाल बहादूर शास्त्री मार्गावरील खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या मार्गावर दिवसरात्र सुरू असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे पेव्हर ब्लॉक घालून बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीची गरज आहे. मात्र, करून दाखविले हे सिद्ध करण्याच्या अट्टाहासापोटी खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांची मलमपट्टी केली जात आहे. महापालिकेने थातूरमातूर उपाययोजना करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना आखावी, अशी मागणी केली जात आहे.
>पावसामुळे येथे खड्ड्यांची संख्या वाढली. हे खड्डे बुजविण्यासाठी आम्ही वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. अधिकाºयांना धारेवर धरल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविले आहेत. मात्र, खड्डे बुजविताना पेव्हर ब्लॉकचा वापर केल्याचे समोर आल्याने आम्ही त्याला आक्षेप घेतला आहे. पेव्हर ब्लॉकऐवजी दुसºया योग्य पर्यायाचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. उर्वरित खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या अधिकाºयांनी दोन-तीन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे आम्ही दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करणार आहोत. मात्र, त्यानंतरही समस्या कायम राहिली, तर मात्र आम्हाला त्याबाबत वेगळा विचार करावा लागेल, असे आम्ही अधिकाºयांना सांगितले आहे.
- आशा सुरेश कोपरकर, स्थानिक नगरसेविका.
>भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपापासून कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरश: चाळण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत रस्त्यांवरील हे खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू आहे. खड्ड्यांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकल्याने, अनेक ठिकाणी खड्डे भरलेली जागा एक ते दोन दिवसांतच पुन्हा खाली गेली आहे. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. काम उरकण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचा प्रतिकूल परिणाम दर्जावर होत असून, नागरिकांना व वाहन चालकांना त्याचा फटका बसत आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन परिस्थिती जैसे थे होत आहे.
- दादा सीताराम देवकर, स्थानिक टेम्पो चालक.