पावसामुळे खड्डे वाढले

By admin | Published: September 23, 2016 04:50 AM2016-09-23T04:50:40+5:302016-09-23T04:50:40+5:30

काही देशीविदेशी कंपन्यांच्या भरवशावर मुंबईला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा दावा करणारी महापालिका चांगलीच तोंडघशी पडली आहे.

Pests have increased due to rain | पावसामुळे खड्डे वाढले

पावसामुळे खड्डे वाढले

Next

शेफाली परब , मुंबई
काही देशीविदेशी कंपन्यांच्या भरवशावर मुंबईला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा दावा करणारी महापालिका चांगलीच तोंडघशी पडली आहे. मुसळधार पाऊस आणि प्रचंड वाहतुकीमुळे अनेक प्रयोगानंतरही खड्ड्यात भरलेले साहित्य कुचकामी ठरत आहे. तर नवीन प्रयोगाच्या खर्चाच्या अंदाजाने पालिकेपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने मुंबईकरांचा प्रवास आणखी खडतर झाला आहे. तरीही मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन अद्याप चाचपडतच आहे.
गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे बुजविण्याचा दावा करणारी महापालिका डेडलाईन पाळण्यात दोनदा अपयशी ठरली आहे. अखेर गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची जबाबदारी घेतल्यानंतर विसर्जनावेळी रस्ते खड्डेमुक्त असतील, अशी हमी प्रशासनाने दिली. मात्र अनंत चतुर्दशीलाही गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाला खड्ड्यांतूनच विसर्जनासाठी न्यावे लागले. परंतु त्यानंतरही मुंबई खड्ड्यातच असताना मुंबईत केवळ ३८ खड्डे असल्याचा दावा करत पालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
१५ सप्टेंबरपासून मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तुंबणारे पाणी, पडलेले खड्डे आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे मुंबईकर मेटाकुटीस आले आहेत. पश्चिम उपनगर सर्वाधिक खड्ड्यांत असून वांद्रे ते दहिसर या पट्ट्यात तब्बल २१६७ खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये आणखी भर पडली आहे. मात्र एकीकडे सतत पाऊस असल्यामुळे खड्डे भरणे अशक्य असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेने रस्त्यांवर हजारो खड्डे असल्याचे मात्र नाकारले आहे.

डागडुजीवर साडेतीन हजार कोटी खर्च
गेल्या तीन वर्षांमध्ये रस्त्यांच्या डागडुजीवर साडेतीन हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबई खड्ड्यात आहे. याची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन जुलैमध्ये दिले होते. त्याप्रमाणे पाच देशीविदेशी कंपन्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानांचा मुंबईच्या रस्त्यांवर प्रयोग झाला. एक कंपनी अपयशी ठरली तर अन्य दोन कंपन्यांच्या उच्च दर्जाच्या साहित्याच्या खर्चाने पालिकेच्या तिजोरीला खड्डा पडण्याचीच चिन्हे आहेत. पालिका वापरत असलेले साहित्य १० रुपये प्रती किलो दराने मिळते. तर परदेशी प्रयोगासाठी प्रती किलो १२० ते १९० रुपये खर्च करावे लागणार आहेत.


पावसाचा धिंगाणा सुरूच
शहरात गेल्या गुरुवारपासून पावसाने कहर केला आहे. सलग सात दिवस शहर आणि उपनगरात संततधार सुरू आहे. गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहिला. सकाळी ५ ते ८ यावेळेत तुफान मारा झाल्यामुळे मुंबापुरीचा वेग मंदावला. त्यामुळे नोकरदारांना कार्यालय गाठण्यास उशीर झाला. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेत अनुक्रमे १४५.८, १०४.१ मिलीमीटर नोंद झाली आहे.
सकाळी पावसामुळे हिंदमाता, शीव रोड क्रमांक २४, महेश्वरी उद्यान, मोतीशहा लेन, मुख्याध्यापक भवन, माटुंगा रेल्वे स्थानक, सांताक्रूझ येथील शास्त्री नगर, वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालय, जुहू बसस्थानक, कुर्ला पश्चिमेकडील प्रीमियर कंपनी, कुर्ला येथील कमानी, चेंबूर येथील जिजामाता नगर, माहुल येथील आरसीएफ रोड या परिसरात पाणी साचले होते. महापालिकेच्या विभागीय कार्यालयामार्फत घटनास्थळी अधिकारी आणि कामगार पाठवून मॅनहोलची झाकणे काढून तसेच जाळ्यांवरील कचरा हटवून पाण्याचा निचरा करण्यात आला. सायन रोड क्रमांक २४, नॅशनल महाविद्यालय, एस. व्ही. रोड, जीनाबाई मुलजी राठोड मार्ग, हिंदमाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कोहिनूर मॉल, प्रीमियर रोड, महेश्वरी उद्यान आणि मोतीशहा लेन या मार्गावरील बेस्टची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती.
पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे शहरात ५, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात ४, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण १७ ठिकाणी झाडे पडली. २३ आणि २४ सप्टेंबर रोजी शहर आणि उपनगरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. मुंबईकरांना जोरदार सरींचा फटका असाच बसणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत जोर कायम राहील, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

Web Title: Pests have increased due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.