Join us

पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २६ आणि २७ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार परीक्षा

By सीमा महांगडे | Published: August 22, 2022 8:11 PM

पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४७८१ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पेट (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार मानव्यविद्याशाखेच्या परीक्षा २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा २६ ऑगस्ट रोजी २ ते ४ या वेळेत घेतल्या जाणार आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या परीक्षा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान आणि आंतरविद्याशाखेच्या परीक्षा सुद्धा २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या काळात होणार असून या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. २० ऑगस्टपासून विद्यार्थ्यंच्या सरावासाठी सुरु झालेल्या ऑनलाईन सराव परीक्षा २३ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.  पेट परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये एकूण ४७८१ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्याशाखानिहाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक २१०० एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १२३३, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७८४ आणि आंतरविद्याशाखेसाठी ६६४ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक ५८४ एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापाठोपाठ व्यवस्थापन या विषयासाठी २४८ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत

टॅग्स :परीक्षा