Join us

पीटर मुखर्जीची दिल्लीतून आॅर्थर रोड जेलमध्ये वापसी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 9:18 PM

आयएनएक्स मिडीयाच्या कंपनीच्या परदेशातील गुंतवणूक हवाला प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी पीटर मुखर्जीची केंद्रीय गुन्हा

मुंबई: आयएनएक्स मिडीयाच्या कंपनीच्या परदेशातील गुंतवणूक हवाला प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी पीटर मुखर्जीची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली पथकाने रविवारी सकाळी आॅर्थर रोड जेलमध्ये पुन्हा रवानगी केली. दिल्लीत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याला १३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाल्याने रेल्वेतून मुंबईत आणण्यात आले असून यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याची सुनावणी घेतली जाणार आहे.याप्रकरणात कॉँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम याने त्यांच्याकडून लाच स्विकारल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र पीटरने यासंदर्भात माहिती देण्यास असहकार्य करीत असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.आयएनएक्स मिडीयाला २००७ मध्ये परदेशातून ७७३ कोटीचा निधी मिळवून देण्यामध्ये कार्ती चिदंबरमने लाखो रुपये घेतल्याचा आरोप असून याप्रकरणी २८ फेबु्रवारीला कार्तीला अटक झाली होती. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने महिन्यापूर्वी त्याची व इंद्राणी मुखर्जी यांना भायखळा महिला कारागृहात समोरासमोर बसवून चौकशी केली होती. इंद्राणी हिने कार्ती याला लाच दिल्याची कबुली दिली असलीतरी कार्ती व त्याचा लेखा परीक्षक (सीए) एस. भास्करमन यांनी फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या व्यवहारात सहभागी असलेल्या पीटर मुखर्जी याच्यावरही मनी लॉण्ड्रिग अतर्गंत गुन्हा दाखल करुन दिल्लीला नेले होते. शनिवारी पतियाळा कोर्टात हजर केले असता त्याला १३ एप्रिलपर्यत न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यामुळे त्याला रेल्वेने पुन्हा मुंबईत आणण्यात आले. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावरुन त्याची थेट आॅर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली.-----------------------