पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By Admin | Published: December 29, 2015 02:17 AM2015-12-29T02:17:53+5:302015-12-29T02:17:53+5:30
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी दंडाधिकाऱ्यांनी ११ जानेवारीपर्यंत वाढ केली. पीटर मुखर्जीची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपली.
मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी दंडाधिकाऱ्यांनी ११ जानेवारीपर्यंत वाढ केली. पीटर मुखर्जीची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपली. त्यामुळे न्या. आर.व्ही. अदोणे यांनी ११ जानेवारीपर्यंत मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
सोमवारच्या सुनावणीवेळी पीटरला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले नाही. त्याचे वकील कुशल मोर दंडाधिकाऱ्यांपुढे उपस्थित होते. ‘पोलिसांची संख्या कमी असल्याने पीटरला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करणे जमले नाही,’ असे विशेष सीबीआय वकील कविता पाटील यांनी न्या. अदोणे यांना सांगितले. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने पीटरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणीही अॅड. पाटील यांनी केली. पीटर मुखर्जी हा शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा नवरा आहे. सीबीआयने पीटरला १९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. पीटरवर पोलीग्राफ चाचणी करण्यासाठी दिल्लीला नेण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. (प्रतिनिधी)
- सध्या पीटरला आर्थर रोड जेलमध्ये कडक बंदोबस्तात ठेवले असून, या जेलमध्ये इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्यामवर रायलाही ठेवले आहे. सीबीआयने इंद्राणी, संजीव खन्ना व श्यामवर राय या तिघांवर आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शीनाची हत्या आर्थिक कारणास्तव केली आहे.