पीटरच्या जामिनावरील सुनावणी तहकूब
By admin | Published: July 8, 2016 02:34 AM2016-07-08T02:34:46+5:302016-07-08T02:34:46+5:30
शीना बोरा हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने १९ जुलैपर्यंत तहकूब केली. पीटरच्या जामीन
मुंबई : शीना बोरा हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने १९ जुलैपर्यंत तहकूब केली. पीटरच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी सीबीआयने दोन आठवड्यांची मुदत मागितली. विशेष सीबीआय न्यायालयाने दोनदा जामीन फेटाळल्याने पीटरने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि इंद्राणीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पीटर मुखर्जी याला ताब्यात घेतले. आपल्या विरोधात पोलिसांकडे काहीही पुरावे नाहीत. त्यामुळे जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती पीटरने विशेष सीबीआय न्यायालयाकडे केली. मात्र सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसल्याचे विशेष न्यायालयाला सांगितले.
तपास सुरू असल्याच्या आधारावर जामीन फेटाळण्याच्या निर्णयावर पीटर मुखर्जीने प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘तपास यंत्रणेकडे अद्याप पीटरविरुद्ध ठोस पुरावे नाहीत. आरोपपत्र दाखल केल्यानंतर पुढील तपास करण्यासाठी कालावधी निश्चित नसतो. केवळ तपास सुरू आहे, या कारणाखाली एखाद्याला अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवणे योग्य नाही. केवळ संशयाच्या आधारावर पीटरला कारागृहात ठेवण्यात आले आहे,’
असे पीटरच्या जामीन अर्जात म्हटले
आहे. (प्रतिनिधी)