नायगाव : वसईतील हेरिटेज इस्पितळ समजले जाणार्या डी. एम. पेटीट रूग्णालयातील चारचाकी, दुचाकी पार्किंग बंद करण्याचा निर्णय पालिकेमार्फत घेण्यात आला आहे. अल्पावधीत त्याची अंमलबजावणी होणार आहे, मात्र यानंतर वाहने पार्क करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहनधारकांची पंचाईत होणार आहे. ‘जाणता राजा’ अपघात प्रकरणानंतर जखमींना या इस्पितळात आणताना रुग्णवाहिकांना प्रवेश करण्यास या वाहनांचा अडसर झाला होता. त्यानंतर येथून रुग्ण अन्यत्र हलवतानाही पार्किंगमुळे वेळेचा अपव्यय झाला होतो. सध्या या भागात पार्किंगसाठी पालिकेची अन्य जागा नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सभापतींसह स. आयुक्तांची वाहनेही या इस्पितळ परिसरातच पार्क असतात. बाजारहाट व अन्य कामांसाठी आलेले नागरिक याच भागात पार्किंग करतात, मात्र त्यामुळे आपत्कालीन स्थितीत समस्या उद्भवत असल्याचे दि. २० मे रोजीच्या प्रसंगावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या इस्पितळ परिसरातील वाहनांना पार्किंगला मज्जाव करण्यात येणार आहे. या भागातील रस्ते रूंदीकरण काही कारणास्तव खोळंबले आहे. त्यामुळे वाहने पार्किंगसाठी पर्यायी जागा नाही. (वार्ताहर)
पेटीट रुग्णालयातील पार्किंग बंद होणार
By admin | Published: May 23, 2014 3:19 AM