Join us

वायकरांना विजयी घोषित करण्याविरोधात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:15 PM

वायकर यांना घोषित करताना केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी शहा यांनी याचिकेद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभेच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्याच्या निर्णयाला एका अपक्ष उमेदवाराने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ४ जून रोजी झालेल्या मतमोजणीत गैरव्यवहार व बेकायदेशीरपणा झाल्याचा आरोप करत पराभूत अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी हा निकाल रद्दबातल करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे.

वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यावर अवघ्या ४८ मतांनी विजय मिळविला. भरत शहा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. उत्तर पश्चिम मतदारसंघात एकूण ९ लाख ५४ हजार ९३९ मतदान झाले. त्यापैकी शहा यांना ९३७ मते मिळाली. वायकर यांना घोषित करताना केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी शहा यांनी याचिकेद्वारे केली आहे. सुरुवातील कीर्तीकर आघाडीवर होते. नंतर अवघ्या ४८ मतांनी वायकर जिंकले.

ईव्हीएमचा गैरवापर;  शहा यांचा आरोप ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आला, असा आरोप शहा यांनी केला. संबंधित मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :रवींद्र वायकर