मुंबई : जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने व नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख रागिणी पारेख यांची बदली करण्यासाठी गेले सहा दिवस जे.जे.चे निवासी डॉक्टर संपावर आहेत. संपूर्ण राज्यातून जे.जे.मध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांचे हाल होत असल्याने डॉक्टरांना संप मागे घेण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाला आज सुटी असतानाही या अर्जावर सुनावणी घेण्याकरिता विशेष न्यायालय बसणार आहे.४ ते ६ एप्रिल या काळात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्ते अफाक मांडविया यांनी केला आहे. (प्रतिनिधी)> मार्डला ‘कारणे दाखवा’ नोटीसमुंबई : जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकला शुक्रवारपासून सेंट्रल मार्डने सक्रिय पाठिंबा देत राज्यव्यापी मास बंक पुकारला. निवासी डॉक्टरांचा मास बंकचा तिढा सुटत नसल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मार्डला कारणे दाखवा नोटीस शुक्रवारी पाठविली आहे. ७ एप्रिलला विधान परिषदेचे सभापती यांनी निवासी डॉक्टरांना तत्काळ कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही हा आदेश फेटाळून मार्डने राज्यव्यापी मास बंक पुकारला. त्यामुळे आता कर्तव्यावर रुजू न झाल्यास मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करू, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मार्डने आपला निर्णय अजूनही बदललेला नाही. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची बदली करा, अशी मार्डची प्रमुख मागणी आहे. शासनाशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्यामुळे राज्यव्यापी मास बंक करण्याचा निर्णय अखेर ५ दिवसांनी घेण्यात आला. राज्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने मार्डच्या संपाला पाठिंबा दर्शविला असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या संपाविरुद्ध हायकोर्टात याचिका
By admin | Published: April 09, 2016 4:00 AM