Join us

महावितरणची २४ हजार २५१ कोटी महसूल वाढीसाठी याचिका

By admin | Published: March 23, 2017 1:52 AM

महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे फेरआढावा याचिका दाखल केली असून, या याचिकेत तीन वर्षांसाठी

मुंबई : महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे फेरआढावा याचिका दाखल केली असून, या याचिकेत तीन वर्षांसाठी २४ हजार २५१ कोटी रुपये महसूल वाढीची म्हणजे सरासरी १२ टक्के दरवाढीची मागणी केली आहे. महावितरणने दाखल केलेल्या या फेरआढावा याचिकेवर प्राथमिक सुनावणी २३ मार्च रोजी होणार असून, या फेरआढावा याचिकेला महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने विरोध दर्शविला आहे.महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या बहुवार्षिक दरनिश्चिती याचिकेवर सुनावण्या घेत ३ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘दर आदेश’ जाहीर केले असून, १ नोव्हेंबर २०१६पासून नवे वीजदर लागू केले आहेत. मात्र पुन्हा महावितरणने फेरआढावा याचिका दाखल केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील वर्षी बहुवर्षीय दरनिश्चिती याचिकेद्वारा महावितरणने चार वर्षांत एकूण ५६ हजार ३७२ कोटी रुपये वाढीची मागणी केली होती. आयोगाने मात्र ९ हजार १४९ कोटी वाढीस मंजुरी दिली. परिणामी, पुन्हा २४ हजार २५१ कोटी रुपयांची मागणी म्हणजे दरवाढीचा प्रस्ताव आहे. महावितरणची ही फेरआढावा याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही फेरआढावा याचिका नसून, दरवाढ प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव दाखल झाल्यास याविरोधात राज्यभर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)