अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:26 AM2023-04-01T06:26:59+5:302023-04-01T06:27:05+5:30

मलबार हिल पोलिस ठाण्याने अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला.

Petition of Anil Jaisinghani; The court reserved the verdict | अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून

अनिल जयसिंघानीची याचिका; न्यायालयाने निकाल ठेवला राखून

googlenewsNext

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या लाच व खंडणीप्रकरणी करण्यात आलेली अटक बेकायदा आहे, असा दावा बुकी अनिल जयसिंघानीने केला आहे. न्यायालयाने त्याच्या याचिकेवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला.

मलबार हिल पोलिस ठाण्याने अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर २० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली. आपल्याला १९ मार्च रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी आपल्याला  २४ तासांत न्यायालयात हजर न करता ३६ तासांनी न्यायालयात हजर केले. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा आहे, असा युक्तिवाद जयसिंघानीचे वकील मृगेंद्र सिंह यांनी केला. 

या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर तक्रारदाराच्या पतीचे (देवेंद्र फडणवीस) लक्ष होते, असा आरोप सिंह यांनी केला. सरकारतर्फे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी सर्व आरोप फेटाळले. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले. त्याला न्यायालयात हजर करण्यात विलंब झालेला नाही. १९ मार्च रोजी पोलिसांनी केवळ त्याचा ताबा घेतला आणि पोलिसांना आरोपीला मुंबई दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करायचे होते. आरोपीला २० मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता अटक करण्यात आली आणि २४ तासांत दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले, अशी माहिती सराफ यांनी न्यायालयाला दिली. न्या. अजय गडकरी व न्या. आर. एन. लढ्डा यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला.

विशेष कोर्टानेही...

एका प्रकरणात मध्यप्रदेश पोलिसांनी अनिल जयसिंघानीच्या ट्रान्झिट रिमांडसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला. दरम्यान, न्यायालयाने जयसिंघानीच्या जामीन अर्जावरील निकालही राखून ठेवला. मध्यप्रदेश पोलिसांना जयसिंघानी अबकारी कायदा व भारतीय दंडसंहितेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात हवा आहे. 

Web Title: Petition of Anil Jaisinghani; The court reserved the verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.