लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पत्नीच्या माहेरचे तिला जबरदस्तीने राजस्थानला घेऊन गेल्याने पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्नीला न्यायालयात हजर करण्यात यावे व तिचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी पतीने हेबियस कॉर्पस (व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी याचिका) दाखल केली आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे व शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मीरा रोड पोलिस ठाण्यात वर्षा (बदलेले नाव) ला २० जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. साहिल चौधरी (२२) याने दाखल केलेल्या याचिकेनुसार, धर्मांतर करण्यापूर्वी साहिलचे नाव फैज अन्सारी होते. फैज व वर्षा यांची भेट ते शिकत असताना २०१७ मध्ये झाली. ते एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वर्षाच्या पालकांचा आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्याने फैजने हिंदू धर्म स्वीकारला.
२६ फेब्रुवारी २०२२ रोजी दोघांनी वांद्रे येथील विश्वेश्वर मंदिरात विवाह केला. ८ जुलै २०२२ रोजी त्यांच्या विवाहाची मुंबई महापालिकेत नोंदणी करण्यात आली. मात्र, विवाहानंतरही दोघे विभक्त राहिले. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्षाने पालकांचे घर सोडले आणि साहिलच्या घरी राहण्यासाठी आली. पालकांचे घर सोवण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती, असे याचिकेत म्हटले आहे.
२५ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात अखेरचा संवाद झाला. त्यावेळी वर्षाने साहिलला आपल्याला परत घरी यायचे आहे. घरी नेण्यासाठी ये, असा आग्रह धरला. त्यावेळी त्याला समजले की, वर्षाला तिच्या गावी म्हणजे राजस्थानला नेण्यात आले आहे. १८ मार्च २०२३ रोजी राजस्थानच्या वकिलांनी त्याला वर्षाच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, हिंदू धर्म स्वीकारताना त्याने योग्य त्या धार्मिक विधी पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे हा विवाह रद्द झाला आहे, तसेच दुसरी नोटीस महापालिकेला पाठवून हा विवाह रद्द करण्याची विनंती करण्यात आली.
हरवल्याची तक्रार
- वर्षा साहिलच्या घरी असतानाही तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावले.
- वर्षाने आपण हरवले नसून आपल्या पतीच्या घरी राहत असल्याचे पोलिसांना सांगितले, तरीही पोलिसांनी वर्षाला चार दिवस माहेरी पाठविण्यास भाग पाडले, असे साहिलने याचिकेत म्हटले आहे.