नवी दिल्ली : मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी करण्यात आलेल्या याचिका आणि त्यात सहभागी होण्यासाठी करण्यात आलेले इतर अर्ज हा बदनामी आणि न्यायसंस्थेविषयी निष्कारण सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केले.दिल्लीतील तेहसीन पूनावाला, मुंबईतील बंधुराज लोणे आणि बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादाला महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी उत्तर दिले व या याचिकांना कोणताही तार्किक आणि कायदेशीर आधार नसल्याने त्या फेटाळून लावाव्या, अशी मागणी केली.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे उत्तराचा युक्तिवाद करताना रोहटगी म्हणाले की, जणू काही खुनाचा खटला सुरु आहे असे समजून याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला. पण प्रस्तूत प्रकरणाची व्याप्ती लोया यांचा मृत्यू आजारामुळे झाला की तो अनैसर्गिक होता एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.न्यायाधीश लोया यांचा मृत्यू सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्याची सुनावणी सुरु असताना झाला व या खटल्यात सुरुवातीला भाजपा अध्यक्ष अमित शहा हेही आरोपी होते हा संदर्भ लक्षात घेऊन सत्ताधाºयांमधील कोणाला तरी गळाला लावण्याच्या सुप्त हेतूने या याचिका करण्यात आल्या आहेत, असाही त्यांनी आरोप केला.रोहटगी म्हणाले की, जनहिताच्या नावाखाली याचिका करणारे हे याचिकाकर्ते लोया यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी जागे झाले. इंटरनेट माध्यमात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने त्यांना जाग आली. मात्र स्वत: कोणतीही शहानिशा न करता त्यांनी छापून आलेले ब्रह्मसत्य मानले अणि फक्त ‘कट पेस्ट’चे काम करून याचिका तयार केल्या.... तर इतर न्यायाधीशही सहभागी?लोया यांच्या मृत्यूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मजकूर गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य गुप्तचर विभागाने चौकशी केली. त्या चौकशीत लोया यांचा मृत्यू होईपर्यंत व नंतर अंत्यसंस्कार होईपर्यंत जे इतर न्यायाधीश त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे होते त्यांचे जबाब नोंदविम्यात आले. त्या सर्वांनी लोया यांना नैसर्गिक मृत्यू आल्याचे सांगितले आहे.या न्यायाधीशांना खोटे सांगण्याचे किंवा त्यांच्या जबान्यांवर विश्वास न ठेवण्याचे काही कारण नाही. एवढेच नव्हे तर मुख्य न्यायाधीशांनी कळविल्यानंतर मुंबई उच्च न्यायालायचे न्यायाधीशही अर्धा तासात तेथे पोहोचले होते. या सर्वांवरच अविश्वास दाखवायचा झाल्यास या न्यायाधीशांचाही लोया यांच्या मृत्यूत हात होता, असे म्हणावे लागेल.
‘ती’ याचिका निव्वळ बदनामी, गोंधळासाठी; लोया प्रकरणात राज्य सरकारचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:21 AM