मुंबई : राज्यातील ३१ लोकसभा मतदारसंघांत प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण मतदान प्रक्रियेबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. न्यायालयाने निवडणूक आयोग आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवावा. नियमानुसार फेरमतदान घ्यावे, अशा मागणीच्या निवडणूक ३१ याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिली.प्रत्यक्ष मतदान आणि मतांची संख्या यात तफावत असल्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाच्या निर्देशानंतरच निकाल जाहीर करावा, असा नियम आहे. लोकसभा निवडणुकीत तफावत आढळूनही या नियमाचे पालन केलेले नाही. त्यामुळे मतांमधील तफावतीचा खुलासा मागवावा. तसेच फेरमतदान घ्यावे, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले.>काँग्रेसला फक्त ४० जागांचा प्रस्तावराज्यातील काँग्रेसची स्थिती पाहूनच आम्ही त्यांना ४० जागांचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे, पुढे काय करायचे ते काँग्रेसने ठरवावे. सध्या केंद्रात आणि राज्यातही त्यांच्याकडे निर्णय घेणारेच कोणी नाही. त्यामुळे धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाल्याची टीका आंबेडकर यांनी केली.सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत आम्ही उमेदवार दिले होते. त्याप्रमाणे सर्व विधानसभा मतदारसंघ लढण्याची आमची तयारी आहे. एमआयएमने शंभर जागांची मागणी केली आहे यावर, ओवेसी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघांच्या संख्येवर चर्चा झाली नाही. निवडून येणे या निकषावर चर्चा झाली. जिथे जिंकण्याची शक्यता आहे त्या जागांचा आग्रह धरण्याचा निर्णय झाला आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ३१ लोकसभा मतदारसंघांत फेरमतदानासाठी याचिका - आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:14 AM