‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:43 AM2018-12-07T05:43:51+5:302018-12-07T05:44:00+5:30
‘केदारनाथ’ या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुंबई : ‘केदारनाथ’ या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आज, शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चारधामपैकी एक असलेल्या केदारनाथ या पवित्र देवस्थानाच्या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपट कसा तयार केला जातो, असा सवाल करत या चित्रपटाविरोधात अॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अॅड. प्रभाकर त्रिपाठी यांच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे पुन्हा परीक्षण करावे. तोपर्यंत चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. तर ही याचिका राजकीय हेतूने प्रभावित असल्याचे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र (सेन्सॉर) बोर्डाने म्हटले. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहून त्यातील अनावश्यक भाग आधीच वगळला आहे. त्यामुळे प्रदर्शन थांबवण्याची गरज नाही, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळला.