मुंबई: नेहमीप्रमाणे आजही इंधनाचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 11 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना पेट्रोलसाठी 88.29 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल प्रति लिटर 24 पैशांनी महागलं आहे. डिझेलचा दर 79.35 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सततच्या दरवाढीनं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, अशी घोषणा देऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले. मात्र सर्वसामान्यांची महागाईपासून सुटका झालेली नाही. उलट पेट्रोल, डिझेलच्या दरांनी ऐतिहासिक दरवाढ नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलनं नव्वदी पार केली होती. त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा रोष लक्षात घेऊन सरकारनं 4 ऑक्टोबरला पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी केले. मात्र त्यानंतर गेल्या 12 दिवसात पेट्रोलचे दर सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोल पुन्हा एकदा नव्वदी पार करेल, असा अंदाज आहे. डिझेलच्या दरातही सातत्यानं वाढ सुरू आहे. त्यामुळे माल वाहतूक महागली आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोलचे दर वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ झाल्यानं प्रति लिटर पेट्रोलसाठी 82.23 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेल 23 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे आज दिल्लीत डिझेलसाठी 75.69 रुपये मोजावे लागतील. इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यानं भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत. मात्र त्याचा परिणाम राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.