पेट्रोल-डिझेल कपातीत ‘अशीही बनवाबनवी’, वाहतूकदारांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 03:18 AM2018-10-07T03:18:16+5:302018-10-07T03:18:38+5:30
पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा उडालेला भडका आणि त्यामुळे विरोधकांसह सोशल मीडियावर व्यक्त होणारा रोष लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रति लीटर अडीच रुपयांची कपात जाहीर केली.
- चेतन ननावरे
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा उडालेला भडका आणि त्यामुळे विरोधकांसह सोशल मीडियावर व्यक्त होणारा रोष लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रति लीटर अडीच रुपयांची कपात जाहीर केली. तर राज्य सरकारनेही गुरुवारी पेट्रोलमध्ये अडीच, तर शुक्रवारी डिझेलच्या दरांत १.५६ रुपयांची कपात करत असल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात शनिवारी पेट्रोलमध्ये ५ ऐवजी ४.३७, तर डिझेलमध्ये ४.०६ रुपयांऐवजी ३.३५ रुपयांची कपात झाल्याचे निदर्शनास आले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भातील घेतलेल्या पाठपुराव्यात ही फसवणूक लक्षात आलेली आहे
यासंदर्भात पेट्रोलपंप चालकांची संघटना फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले की, केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने केलेल्या कपातीमध्ये फरक आहे. केंद्र सरकारने प्रति लीटर पेट्रोल-डिझेलवर अडीच रुपये कमी केले. मात्र राज्य सरकारने पेट्रोलवर अडीच रुपये कपातीची घोषणा करत ९ रुपये असलेल्या सेसमध्ये केवळ १.८८ रुपये कपात केली. ७.१२ रुपये सेसची वसुली सुरू आहे. तसेच शुक्रवारी डिझेलमध्ये १.५६ रुपयांच्या कपातीची घोषणा करणाऱ्या राज्य शासनाने प्रत्यक्षात १ रुपया असलेला सेस रद्द केला आहे. त्यामुळे पेट्रोलमध्ये अडीचऐवजी १.८८, तर डिझेलमध्ये १.५६ ऐवजी १ रुपयाची प्रत्यक्ष कपात राज्य शासनाने केली आहे.
बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक राजगुरू म्हणाले की, सातत्याने थापा मारण्याचे काम राज्य सरकार करत आहे. मुळात केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला फाटा देत राज्य सरकारने सर्वात महाग विक्री होणाºया महाराष्ट्रात डिझेलच्या किमती कमी असल्याचा खोटा दावा केला. त्यात केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार अडीच रुपयांऐवजी केवळ १.५६ रुपयांची कपात राज्य सरकारने जाहीर केली.
प्रत्यक्षात मात्र एक रुपयाचा सेस कमी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधातील रोष आणखी वाढेल, यात शंका नाही.
१ रुपया कमी करून ३0 पैशांची वाढ
राज्य सरकारने एकीकडे १.५६ पैशांच्या कपातीची घोषणा केल्यानंतरही प्रत्यक्षात १ रुपया सेस रद्द केला. ही कपात लागू करताना तेल कंपन्यांनी शुक्रवारी रात्री डिझेलच्या दरात आणखी ३० पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे शनिवारी डिझेल वापरणाºया ग्राहकांना प्रत्यक्षात १.५६ रुपयांऐवजी केवळ ७० पैशांच्याच कपातीचा फायदा मिळाला आहे.