लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना विमान इंधनाचाही भडका उडाला आहे. गेल्या महिनाभरात एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (एटिफ) दर जवळपास ९.३० टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०२० पासून विमान इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यात कोरोनामुळे प्रवासी क्षमता आणि विमान फेऱ्यांवर लागू केलेल्या मर्यादा, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे प्रवासीसंख्या ६५ टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्र तोट्यात आहे. विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने अलीकडेच विमान तिकिटांवरील किमान मर्यादा वाढविली. त्यामुळे आधीच विमान प्रवास महागला. आता इंधनाचा भडका उडाल्याने विमान तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.
जून महिन्यात विमान इंधनाचे दर ६२ हजार २७९ रुपये किलोलिटर इतके होते. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते ६८ हजार ६४ रुपयांवर पोहोचले आहेत. चालू वर्षाचा विचार करता त्यात ३८.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ४९ हजार ८४ इतके नोंदविण्यात आले होते.
एखाद्या मार्गावर विमानफेरी चालवायची झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चात विमान इंधनाचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक असतो. इतर खर्चात कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल, विमानतळावरील शुल्काचा समावेश असतो. परिणामी विमान इंधन महागले की फेरीमागील खर्चात आपोआप वाढ होते. हा अतिरिक्त भार तिकिटांच्या दरात वाढ करून प्रवाशांकडून वसूल केला जातो. गेल्या महिनाभरात ‘एटीएफ’ जवळपास साडेनऊ टक्क्यांनी महागल्यामुळे विमान प्रवास आणखी महागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
.............
परदेशातून इंधन आणणेही अशक्य
भारतात विमान इंधनाचे दर वाढले की विमान कंपन्या परदेशातून एटीएफ आणण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे तिकीट दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. परंतु, कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरच निर्बंध लागू करण्यात आल्याने हा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे वाढीव खर्च प्रवाशांच्या माथ्यावर मारण्याखेरीज विमान कंपन्यांसमोर अन्य पर्याय राहिलेला नाही
...........
मुंबईतील विमान इंधनाचे दर
महिना...... किंमत (रुपयात)....... वाढ (टक्क्यात)
जानेवारी..... ४९,०८४....... ३.८५
फेब्रुवारी........ ५१,९००.......... ५.७४
मार्च......... ५७,५१९.......... १०.८३
एप्रिल........ ५६,४७९..........-१.८
मे........ ५९,८२२........ ५.९२
जून.......... ६२,२७९.......... ४.११
जुलै....... ६८,०६४........ ९.३०