पेट्रोल-डिझेल महाग, तरी वाहने का वाढली?; मुंबईत १४ लाख कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 12:08 PM2023-09-10T12:08:58+5:302023-09-10T12:11:57+5:30
वाहन संख्या वाढत असताना मेट्रो विस्तार रखडल्याने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केवळ मुंबई लोकलवरच अवलंबून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसंख्या वाढत आहे तशी वाहनांची संख्याही वाढत आहे. हे बदल तसे स्वाभाविक आहेत. मुंबईत एकूण वाहन संख्या ४४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये कारपेक्षा दुचाकींची संख्या जास्त आहे. पेट्रोल-डिझेल महाग, किमती जास्त; तरीही वाहनांची संख्या वाढत आहे, या मागे अनेक कारणे असलीतरी अजूनही शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योग्य नसल्याचे हे चित्र आहे.
वाहन संख्या वाढत असताना मेट्रो विस्तार रखडल्याने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केवळ मुंबई लोकलवरच अवलंबून आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, असा प्रचार होत असला तरी प्रत्यक्षात सागरी महामार्ग, सागरी सेतू, मुक्त मार्ग पाहिले असता वाहतूक धोरण खासगी वाहतुकीलाच पोषक असल्याचे स्पष्ट होते. यामुळे आता धोरण बदलण्याची वेळ आली आहे.
प्रत्यक्ष उपायांची गरज
रेल्वे-मेट्रो या विजेवर धावत असल्याने त्याचे प्रदूषण होत नाही.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी अद्याप व्यापक पायाभूत सुविधा नसल्याने वाहनचालक या वाहनांकडे वळलेला नाही.
यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासह चार्जिंग स्थानक उभारण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
लोकांचा आर्थिकस्तर उंचावला आहे. त्यामुळे ते जास्त गाड्या घेतात. दुसरीकडे, प्रतिष्ठेसाठी नागरिक कर्ज घेऊन गाड्या घेतात. ही कर्ज प्रक्रिया सोपी असल्याने अनेकजण गाड्या घेत आहेत. आजही वृद्ध व्यक्ती सार्वजनिक वाहनांचा वापर करतात; पण जिम करणारे तरुण चालण्याचे टाळून खासगी
गाड्या वापरतात.
- विद्याधर दाते, वाहतूक तज्ज्ञ