नवी दिल्ली : मंगळवारी पेट्रोल २७ पैशांनी, तर डिझेल २९ पैशांनी महाग झाले असून, मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर उभे असतानाच डिझेलनेही नव्वदी पार केली आहे.
मागील १५ दिवसांतील ही १० वी दरवाढ ठरली आहे. ४ मेपासून पेट्रोल २.४५ रुपयांनी, तर डिझेल २.७८ रुपयांनी महाग झाले आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९९.१४ रुपये लिटर, तर डिझेल ९०.७१ रुपये लिटर झाले. राजस्थान आणि मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पेट्रोल आधीच १०० रुपयांच्या वर गेले आहे. रत्नागिरी, परभणी, औरंगाबाद, इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, जैसलमेर, श्रीगंगानगर आणि बन्सवारा यांचा त्यात समावेश आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल ९२.८५ रुपये लिटर, तर डिझेल ८३.५१ रुपये लिटर झाले. राज्यांकडून पेट्रोल व डिझेलवर व्हॅट तसेच स्थानिक अधिभारांची आकारणी केली जात असल्यामुळे प्रत्येक राज्यातील इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये करांचे प्रमाण सर्वाधिक आहे.