मुंबई : इंधन दरवाढीचा चटका सलग बाराव्या दिवशी बसला असून सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी एका दिवसातील विक्रमी दरवाढ केली. पेट्राेल ३९ तर डिझेल ३७ पैशांनी महाग झाले. या दरवाढीनंतर मुंबईसह अनेक ठिकाणी पेट्राेल आणि डिझेलच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. मुंबईत पेट्राेलने विक्रमी ९७ रुपये प्रतिलिटरची पातळी गाठली, तर डिझेलचे दर ८८.०६ रुपये प्रतिलिटर झाले. इंधनाच्या विक्रमी दरवाढीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रथमच माैन साेडले. इंधन दरवाढीचा मुद्दा धर्मसंकट असल्याचे सीतारामन म्हणाल्या
तेल कंपन्यांकडून पेट्राेल आणि डिझेलचे दर २०१७ पासून दरराेज बदलण्यात येतात. शनिवारची दरवाढ तेव्हापासून एका दिवसातील सर्वाेच्च ठरली आहे. सलग १२ दिवसापासून पेट्राेल आणि डिझेलची दरवाढ हाेत आहे. कच्च्या तेलाचे दरही ६५ रुपये प्रतिबॅरलपर्यंत गेले आहे. त्यामुळे पेट्राेल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. देशातील काही ठिकाणी पेट्राेलचे दर शंभरीपार गेले आहेत. महाराष्ट्रातही नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे पेट्राेलने शंभरी गाठली आहे. गेल्या १२ दिवसामध्ये पेट्राेलचे दर ३.६३ रुपये तर डिझेलचे दर ३.८४ रुपये प्रतिलिटर एवढे वाढले आहेत.