विमान इंधनापेक्षाही पेट्रोल महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:06 AM2021-07-31T04:06:38+5:302021-07-31T04:06:38+5:30
मुंबई : विमान प्रवास म्हणजे सर्वसामान्यांचे दिवास्वप्न. कारण तिकिटांचे दर आणि विमानातील खानपानाचा खर्च हा त्याच्या महिन्याच्या कमाईपेक्षाही अधिक ...
मुंबई : विमान प्रवास म्हणजे सर्वसामान्यांचे दिवास्वप्न. कारण तिकिटांचे दर आणि विमानातील खानपानाचा खर्च हा त्याच्या महिन्याच्या कमाईपेक्षाही अधिक असतो. मात्र, आता पेट्रोलचे दर विमान इंधनापेक्षा दुपटीने वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकीचा प्रवासही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत विमान इंधनाचा दर प्रतिलिटर ६८.६४ रुपये, तर पेट्रोल १०७.८३ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाने कंबरडे मोडले असताना इंधनदरवाढीचे चटके मुंबईकरांना सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे, सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. कारण बेस्टची सेवा हा अतिरिक्त ताण सहन करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची परवानगी देऊन, सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हलका करा, अशी मागणी केली जात आहे.
हा बघा फरक ! (दर प्रति लिटर)
विमान इंधन (ए.टी.एफ) - ६८.६४
पेट्रोल - १०७.८३
.....
२) शहरातील पेट्रोल पंप - २५३
देशात दररोज लागणारे पेट्रोल - ४.४ दशलक्ष बॅरल
.....
३) शहरातील वाहनांची संख्या
दुचाकी - २४ लाख
चारचाकी - १५ लाख
.....
४) कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी लागतात हजार
प्रतीक पाटील हा तरुण शिक्षण पूर्ण करून एका खासगी कंपनीत नोकरीला लागला तोच लॉकडाऊन सुरू झाले. लोकल बंद असल्याने कार्यालय गाठण्यासाठी त्याने दुचाकी खरेदी केली. सुरुवातीला ५०० रुपयांचे पेट्रोल आठवडाभर पुरायचे. मात्र, आता ६५० रुपये लागतात. त्यात गाडीचा हफ्ता. गाडीचा खर्च इतका वाढला आहे की, घरात पूर्वीसारखे पैसे देता येत नसल्याने अडचण झाल्याचे त्याने सांगितले.
.....
५) पगार कमी, खर्चात वाढ
कोरोनामुळे दोन वर्षे पगारवाढ झालेली नाही. एखाद दिवस गैरहजर राहिल्यास वरिष्ठ नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात. त्यामुळे नवी गाडी घेतली; पण पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे महिनाअखेरीस १०० रुपयेही खिशात उरत नाहीत.
- राजन बने, वाहन चालक
...
१५ हजार पगार मिळतो. लोकल बंद असल्याने सेकंडहँड दुचाकी घ्यावी लागली. पवईवरून वाशीला जायला साडेतीन हजारांचे पेट्रोल लागते. घरात धान्य भरले की पगार संपतो. मेंटेनन्स, लाइट बिलसाठी दुसऱ्याकडून पैसे मागावे लागतात. शासनाला सर्वसमान्यांची जराशीही कीव येत नाही का?
- सागर कदम, वाहन चालक