Join us

वाढता वाढता वाढे! पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 7:22 AM

मुंबईत पेट्रोल 90.35, तर डिझेल 78.82 रुपये प्रति लिटर

मुंबई: एका दिवसाच्या ब्रेकनंतर आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 13 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा दर 90.35 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलसाठी आज मुंबईकरांना 78.82 रुपये मोजावे लागतील. सततच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र अद्याप सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिलेला नाही. मुंबईसोबतच राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 14 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोलचा दर 83 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरात 12 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलसाठी दिल्लीकरांना 74.24 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त २९ मे ते ५ जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर ६ जुलै ते २5 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. पण केंद्र व राज्य सरकारचे भरमसाट करसुद्धा या दरवाढीला कारणीभूत आहेत. कच्चे तेल महाग होत असतानाही दोन्ही सरकारे कर कमी करून जनतेला दिलासा देण्यास तयार नाहीत. त्यातून दर भडकत असून, महागाईमुळे लोकांची होरपळ सुरू आहे.

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल