Petrol Price Cut : डिझेल, पेट्रोलच्या दरांवरून सोशल मीडियावर टिवटिवाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:53 PM2018-10-04T21:53:21+5:302018-10-04T21:53:39+5:30
Petrol Price Cut : केंद्र व राज्य सरकारने गुरुवारी इंधन दरात कपात केली. मात्र, सोशल मीडियावर याबाबत टीकेचा सूर आहे. दर कमी करण्याची ही धूळफेक असून दरातील मोठी तफावत कमी करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.
मुंबई : केंद्र व राज्य सरकारने गुरुवारी इंधन दरात कपात केली. मात्र, सोशल मीडियावर याबाबत टीकेचा सूर आहे. दर कमी करण्याची ही धूळफेक असून दरातील मोठी तफावत कमी करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.
शहर आणि उपनगरात पेट्रोलच्या दराने नव्वदीपार केली आणि डिझेलचे दर ऐंशीच्या घरात पोहोचले होते. सामान्यांच्या मते पेट्रोल शंभरी गाठणार अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र गुरुवारी केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरामध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेच राज्य सरकारने डिझेलच्या किमतीत बदल न करता फक्त पेट्रोलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात केली आहे. दरम्यान, पेट्रोलची किंमत गेल्या सहा महिन्यात तब्बल ११ रुपये वाढवून फक्त ५ रुपयांनी कमी केल्याने जनसामान्यांतून आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही युजर्सनी मात्र सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले.
सोशल मीडियावर या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून आले. ट्विटरवरून #पेट्रोल, #फ्यूल प्राईज कट, #२.५० असे हॅशटॅग वापरून मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. फेसबुक आणि व्हॉटस्अॅप स्टेट्सवर ‘शतक होण्यापूर्वीच पेट्रोल बाद झाले’, ‘पेट्रोलचा विकास रोखला गेला’, ‘फिटनेस चॅलेंज बंद होईल’ असे विनोदात्मक पण संतापजनक मेसेज काही युजर्सनी ठेवले होते. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारने अपेक्षाभंग केल्याचा सूर नेटक-यांमध्ये होता.