Join us

मुंबईत उडाला पेट्रोल दरवाढीचा भडका!, वर्षभरात १४ रुपयांनी वाढ, प्रति लीटर मोजावे लागतात ७९.४१ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 4:58 AM

गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे तब्बल १४ रुपयांनी वाढ करत सरकारने सर्वसामान्यांच्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नावर पाणी टाकले आहे. एकीकडे देशाच्या राजधानी दिल्लीत वर्षभरापासून प्रति लीटर पेट्रोलसाठी ७० रुपयांखाली दर आकारले जात असताना, मुंबईतील दर मात्र सत्तरीवरच असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

- चेतन ननावरे मुंबई : गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे तब्बल १४ रुपयांनी वाढ करत सरकारने सर्वसामान्यांच्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नावर पाणी टाकले आहे. एकीकडे देशाच्या राजधानी दिल्लीत वर्षभरापासून प्रति लीटर पेट्रोलसाठी ७० रुपयांखाली दर आकारले जात असताना, मुंबईतील दर मात्र सत्तरीवरच असल्याची माहिती उघडकीस आली आहे.महत्त्वाची बाब म्हणजे देशात सर्वांत महाग पेट्रोल मुंबईत विकले जात आहे. आजघडीला मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रति लीटर ७९.४१ रुपये मोजावे लागत आहेत. तुलनेने प्रति लीटर पेट्रोलसाठी दिल्लीकरांना ७०.३० रुपये, कोलकातावासीयांना ७३.०५ आणि चेन्नईवासीयांना ७२.८७ रुपये मोजावे लागत आहेत. त्यात दिल्लीमधील पेट्रोलचे दर गेल्या दोन दिवसांत सत्तरीपार गेले आहेत.यापूर्वी गेल्या वर्षभरापासून दिल्लीमधील पेट्रोलचे दर प्रति लीटर ७० रुपयांखालीच होते. याउलट मुंबईतील पेट्रोलचे दर गेल्या वर्षभरात ७० रुपयांखाली आलेले नाहीत. १६ आॅगस्ट २०१६ रोजी पेट्रोलचे प्रति लीटर दर ६५.०४ रुपये इतके होते. तर १६ सप्टेंबर २०१६ रोजी मुंबईतील पेट्रोलच्या दराने सत्तरी (७०.६४) पार केली, ती अद्याप कायम आहे. गेल्या वर्षभरातील हा उच्चांक आहे.संपूर्ण देशात पेट्रोलच्या दराशी मुंबईतील दराची तुलना केल्यास सर्वांत महाग पेट्रोल मुंबईकरांच्या माथी मारले जात आहे. इतर देशांच्या तुलनेत हे दर फारच अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, वाहतूक दरात वाढ झाली असून त्याचा परिणाम सर्वसामान्य वस्तूंच्या किमतींवर होऊ लागला आहे. हीच परिस्थिती राहिल्यास लवकरच एका लीटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना ८० रुपये मोजावे लागतील, अशी भीती तज्ज्ञांमधून व्यक्त केली जात आहे.दर आणखी वाढणार?१४ सप्टेंबर २०१३ रोजीआघाडी सरकारची सत्ता असताना मुंबईकरांनी प्रति लीटर पेट्रोलसाठी सर्वाधिक म्हणजेच तब्बल ८३.६२ रुपये मोजले होते.त्यानंतर आघाडी सरकारच्या काळातच २०१४ सालातील जानेवारी ते आॅगस्ट या ८ महिन्यांदरम्यान मुंबईकरांकडून एक लीटर पेट्रोलसाठी ८० रुपयांहून अधिक दर आकारले जात होते.त्या वेळी विरोधात असलेल्याशिवसेना अणि भारतीय जनता पार्टीने आघाडी सरकारवर टीकेचा भडिमार केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचे दर वाढल्याने मतदारांच्या रोषालाही सरकारला सामोरे जावे लागले होते.विरोधातून सत्तेवर आलेल्या युती सरकारला अवघ्या तीन वर्षांत पेट्रोलच्या दरावर नियंत्रण ठेवण्यात अपयश येताना दिसत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास काहीच दिवसांत पेट्रोलचे दर ८० रुपयांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :पेट्रोल पंपसरकार