मुंबई - बॉलिवूड बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 28 दिवसांनंतर त्याच्या घरी म्हणजे 'मन्नत'वर पोहोचला आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यनच्या सुटकेनंतर खान कुटुंबीयांसह शाहरुखच्या चाहत्यांनाही अत्यानंद झाला. 'मन्नत'च्या बाहेर चक्क ढोल वाजवून फटाके लावून आर्यनचे स्वागत केले. एकीकडे गेल्या 28 दिवस माध्यमांत आर्यन खानच झळकत होता, पण दुसरीकडे या 28 दिवसांत पेट्रोल तब्बल 6.66 रुपयांनी वाढलं आहे.
आर्यन खान 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या अटकेत गेला, ज्यादिवशी आर्यनला अटक करण्यात आली, त्यादिवशी मुंबईत पेट्रोलचे दर 108.15 रुपये प्रतिलिटर होते. तर, डिझेल प्रति लिटर 98.12 रुपयांवर पोहोचले होते. आता, आज 30 ऑक्टोबर रोजी आर्यनची तुरुंगातून सुटका झाली असून तो आपल्या घरी पोहोचला आहे. मन्नत बंगल्यावर आर्यनचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. किंग खानचा लाडला आणि गेल्या महिनाभरातील सोशल मीडियाचा सेन्सेशन ठरलेला आर्यन खान तब्बल 28 दिवसांनी घरी परतला. आर्यन घरी परतला, त्यादिवशी पेट्रोलचे दर 114.81 रुपये एवढे आहेत.
आर्यन ज्यादिवशी तुरुंगात गेला त्यादिवशी 108.15 रुपये असलेला पेट्रोलचा दर आज (ज्यादिवशी तुरुंगातून बाहेर आला) त्यादिवशी 114.81 रुपये म्हणजेच, या 28 दिवसांत पेट्रोल 6.66 रुपयांनी वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गेल्या दोन महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलची दैनिक 30 ते 35 पैशांपर्यंत वाढ होत असल्याने तब्बल 6 ते 7 रुपयांपर्यंत पेट्रोलचे भाव वाढल्याचेही आपल्या लक्षात आलं नाही. सोशल मीडियावरही आर्यनच्या अटक ते सुटका इथपर्यंतच्या पेट्रोल दराचे कोट्स, ट्विटस व्हायरल होत आहेत.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया (Cordelia) क्रूझवर एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी छापा टाकला होता. जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, पार्टी सुरू होण्यापूर्वीच आर्यन खान, अरबाज मर्चंटसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. आर्यन खानसह सर्व आरोपींना 2 ऑक्टोबरची संपूर्ण रात्र कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर, 30 ऑक्टोबर रोजी आर्यनसह त्याचे 2 साथीदार जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत.