Join us  

पेट्रोल पंप कर्मचारी वा-यावर

By admin | Published: October 13, 2014 3:57 AM

ऐन सणासुदीच्या काळात चेंबूरमधील एच. पी. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २६ कर्मचा-यांना कंपनीच्या कंत्राटदाराने कामावरून काढून टाकले आहे.

मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात चेंबूरमधील एच. पी. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २६ कर्मचाऱ्यांना कंपनीच्या कंत्राटदाराने कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कामावर परत घेण्यासाठी गेल्या १३ दिवसांपासून हे सर्व कर्मचारी पेट्रोल पंपाबाहेरच बसून आहेत. चेंबूरमधील भक्तीभवन परिसरात एच. पी. कंपनीच्या मालकीचा छगन मिठ्ठा हा पेट्रोल पंप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी हा पेट्रोल पंप विविध कंत्राटदारांना चालवण्यास देते. दर दोन-तीन वर्षांनी या पेट्रोल पंपावर कंत्राटदार बदली होतो. मात्र पेट्रोल पंप सुरू झाल्यापासून २६ कर्मचारी कंत्राट पद्धतीने येथे कामाला आहेत. गेल्या ४० वर्षांपासून हे कर्मचारी याच ठिकाणी काम करीत असताना ३० सप्टेंबरला हा पेट्रोल पंप नवीन कंत्राटदाराला चालवण्यास दिला. मात्र नोटीस न देताच १ तारखेपासून कामावर न येण्याचे सर्व कर्मचाऱ्यांना सागितले. यात कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचादेखील हात असल्याचा आरोप हे कर्मचारी करीत आहेत. संपूर्ण आयुष्य याच पेट्रोल पंपावर काम केल्यानंतर अचानक कामावरून काढून टाकल्याने या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सध्या नवीन कंत्राटदाराने या पंपावर सर्व नवीन कर्मचारी भरले आहेत. मात्र काही दिवसांवरच दिवाळीचा सण आल्याने आम्ही आणि आमच्या कुटुंबीयांनी खायचे तरी काय, असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. कामावरून काढून टाकल्यापासून गेल्या १३ दिवसांपासून सर्व २६ कर्मचारी पेट्रोल पंपाबाहेरच बसून दिवस काढत आहेत. घरी जाऊन तरी काय करणार अशी खंत हे कर्मचारी व्यक्त करीत आहेत. ह्यराज्यात निवडणुका असल्याने जमावबंदी आहे. त्यामुळे कुठलाही निषेध व्यक्त न करता हे कर्मचारी या ठिकाणी शांत बसून आहेत. कंपनीने तत्काळ कामावर न घेतल्यास निवडणुका संपल्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत कंत्राटदार नितीन शितोले यांच्याशी संपर्क साधला असता हे सर्व कर्मचारी कंपनीने ठेवले होते. मी त्यांना कामावर ठेवण्यासाठी सहमती दर्शवली होती. मात्र या कर्मचाऱ्यांचा आणि कंपनीचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. हा वाद न्यायालयात असल्याने त्यात माझा काहीही संबंध नाही. (प्रतिनिधी)