मुंबई: इंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 24 पैशांनी , तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना पेट्रोलसाठी 87.84 रुपये, तर डिझेलसाठी 79.13 रुपये मोजावे लागतील. कालही पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यामुळे देशवासीयांना थोडासा का होईना, दिलासा मिळाला आहे. इंधनाचे वाढते दर देशवासीयांसाठी नवे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ही आता नित्याचीच बाब झाली आहे. मात्र सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. काल मुंबईत पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 88.08 रुपये मोजावे लागत होते. त्यात आता आणखी 24 पैशांची कपात झाली आहे. मुंबईत काल डिझेलच्या दरात 11 पैशांची घट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा डिझेलचे दर 10 पैशांनी घटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात केली होती. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलनं नव्वदी पार केल्यानंतर आणि देशातील महानगरांमध्ये पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करत असताना सरकारनं हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढतेच राहिले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर नव्वद रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. मात्र काल आणि आज पेट्रोलच्या दरात घट झाली आहे.
Fuel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात घट; पेट्रोल 24, तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 7:01 AM