पेट्रोल विक्री अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर, चालकांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:04 PM2020-04-22T15:04:49+5:302020-04-22T15:05:19+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात व देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतूक अतिशय तुरळक झाली आहे.

Petrol sales only 10 to 15 per cent, increase in drivers' financial problems | पेट्रोल विक्री अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर, चालकांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ 

पेट्रोल विक्री अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर, चालकांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ 

Next

मुंबई  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात व देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतूक अतिशय तुरळक झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र त्याचा फटका मुंबई व परिसरातील पेट्रोल पंप चालकांना बसू लागला आहे. वाहने रस्त्यावर उतरण्याचे प्रमाण अतिशय खालावल्याने पेट्रोल डिझेलच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. नेहमीच्या तुलनेत इंधन विक्री अवघ्या १५ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांच्या आर्थिक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.


रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठी घट झाल्याने वाहतूक कोंडी नामशेष झाली असून रस्ते मोकळे झाले आहेत. रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र त्याचा फटका पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर झाल्याने चालकांना मात्र आर्थिक समस्या भेडसावू लागल्या आहेत. याबाबत, पेट्रोल डिलर असोसिएशन मुंबईचे माजी अध्यक्ष रवी शिंदे म्हणाले, सद्यपरिस्थितीत पेट्रोल डिझेलची विक्री अवघ्या १५ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. आमचा कर्मचारी वर्ग आमच्या सोबत वर्षानुवर्षे काम करत आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी माणुसकीच्या दृष्ट्रीकोनातून त्यांना  वेळेवर पूर्ण वेतन देणे, भत्ते देणे ही पंप चालकांची जबाबदारी असून आम्ही ही जबाबदारी पूर्ण करत आहोत. पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आल्यावर व इतर वेळी सोशल डिस्टन्सिंगचे कठोरपणे पालन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स पुरवण्यात आले असून त्याचा योग्य व नियमित वापर करण्याकडे लक्ष दिले जात आहे. पेट्रोल पंपचे प्रत्येक आठवड्यात निर्जंतुकीकरण केले जात आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या वाहनचालकांनाच इंधन दिले जात आहे. त्यामुळे विक्रीवर देखील त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत वाहनांची संख्या घटलेली असल्याने इंधन विक्री मंदावली आहे परिणामी काही पेट्रोलपंप चालकांसमोर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन कसे द्यायचे हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली. एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत झालेली कमालीची घट, कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला तळ अशी परिस्थिती असली तरी पेट्रोल डिझेलच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Petrol sales only 10 to 15 per cent, increase in drivers' financial problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.