मुंबई: पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग सोळाव्या दिवशी वाढले आहेत. मुंबईत आज प्रति लिटर पेट्रोलसाठी 86.24 रुपये मोजावे लागतील. तर डिझेल प्रति लिटर 73.79 रुपयांवर जाऊन पोहोचलंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोखण्यात आली होती. मात्र कर्नाटकमध्ये मतदान होताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ पुन्हा सुरु झाली. 15 मे रोजी मुंबईत पेट्रोलचा दर 82.79 रुपये होता. आज हा दर 86.24 रुपयांवर गेलाय. गेल्या 16 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात 3 रुपये 45 पैशांनी वाढ झालीय. या दरवाढीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलाय. असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर - १५ मे - ८२.७९ रुपये१६ मे - ८२.९४ रुपये१७ मे - ८३.१६ रुपये१८ मे - ८३.४५ रुपये१९ मे - ८३.७५ रुपये२० मे - ८४.०७ रुपये२१ मे - ८४.४० रुपये२२ मे - ८४.७० रुपये२३ मे - ८४.९९ रुपये२४ मे - ८५.२९ रुपये२५ मे - ८५.६५ रुपये२६ मे - ८५.७८ रुपये२७ मे - ८५.९६ रुपये२८ मे - ८६.0८ रुपये दरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर वाढत असलेला इंधन दरवाढीचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (वस्तू आणि सेवा कर) कक्षेत आणण्याचा विचार करत असले तरी त्यामुळे कोणताच फायदा होणार नाही, असा दावा जीएसटी नेटवर्क पॅनलचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी केला आहे. जीएसटीत येऊनही इंधनाचे दर कमी होणार नाहीत, राज्येही अतिरिक्त कर लावतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारच्या ‘उपाय’योजनांच्या विचारांनाच हरताळ फासला गेला आहे.
स्वत: बिहारचे वित्तमंत्री असलेले मोदी म्हणाले, जगभरात जिथे-जिथे जीएसटीसारखा कर आहे, तिथे राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाला स्वत:चा उपकर किंवा शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. भारतातही जीएसटीतील सर्वाधिक कर मर्यादेवर स्वत:चे शुल्क लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला सर्वाधिक २८ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणले तरी राज्य सरकार स्वत:चे महसुली नुकसान होऊ नये यासाठी उपकर किंवा शुल्क लावतीलच. त्यामुळेच या निर्णयाचा इंधनाच्या दरांवर अत्यंत माफक परिणाम होईल. दर क्वचितच कमी होऊ शकतील. शिवाय ‘एक देश एक कर’ या योजनेलाही हरताळ फासला जाईल.