Join us

कुत्रा, मांजर पाळताय; तुम्ही परवाना घेतला का? पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे राहते नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:53 PM

मुंबईत अनेक ठिकाणी सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली असून, त्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरण यासंदर्भात पालिका आवश्यक उपाययोजना करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनेक मुंबईकर आपल्या घरी कुत्रा, मांजर पाळत असले तरी अनेकांना अद्यापही यासंदर्भात पालिकेकडून याचा अधिकृत परवाना घेणे आवश्यक आहे याचीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. कुत्रा पाळण्यासाठीचा हा परवाना मुंबई पालिकेकडून बंधनकारक नाही किंवा त्यामुळे दंड होणार नसला तरी तो अत्यावश्यक आहे. कारण यामुळे संबंधित नोंद पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे होत असून, कुत्र्याच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या लसीकरणाची माहिती अद्ययावत केली जाते. यामुळे पाळीव कुत्र्यांच्या आरोग्याची तर दखल घेतली जातेच, पण तो ज्या कुटुंबात वावरतो तेथे त्यामुळे काही आजार उद्भवणार नाही याचीही काळजी घेतली जात असल्याची माहिती पालिका अधिकऱ्यांनी दिली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली असून, त्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरण यासंदर्भात पालिका आवश्यक उपाययोजना करत आहे. मात्र, पाळीव कुत्र्यांना आवश्यक लस न दिल्यास नागरिकांना वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून घरी कुत्रा पाळणाऱ्यांनी त्यांची नोंदणी करावी आणि त्यावेळी आवश्यक लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत फक्त २६ हजार ९७८ पाळीव कुत्र्यांची नोंदणी करत परवाना घेतला आहे. ही नोंदणी कमी असून, कुत्रा पाळणाऱ्या प्रत्येक मुंबईकराने ते करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी परवाना घेतला की त्याची पालिका प्रशासनाकडे नोंद राहते असे सांगितले.

परवाना आवश्यक का?

पाळीव कुत्री पाळणाऱ्या व्यक्तीने कुत्र्याचे पिल्लू लहान असतानाच त्याचे लसीकरण केले पाहिजे कारण, पाळीव कुत्र्यांपासून सर्वाधिक धोका कुत्री पाळणाऱ्या कुटुंबालाच असतो. त्यामुळे पालिकेकडून ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने आणि वेळोवेळी होऊ शकणार असल्याने परवाना काढणे आवश्यक आहे.

प्रक्रिया काय?

पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने कुत्रा पाळण्यासाठी आवश्यक परवान्यासाठी अर्ज करता येतो. कुत्र्याच्या वयाप्रमाणे त्यासाठी दरवर्षी १० रुपयांप्रमाणे ऑनलाइन शुल्क भरावे लागते आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. परवान्याचे दर एका वर्षाने नूतनीकरण आवश्यक असते. ऑनलाइन प्रक्रियेमुळे परवाना हा घरपोच मिळण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांनी या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे: रेबीज आजाराचा धोका कुत्री पाळणाऱ्या कुटुंबाला सर्वाधिक. पाळीव कुत्र्याचे संपूर्ण लसीकरण आवश्यक. चाळीस टक्के संसर्ग लहान मुलांना होण्याची भीती. परवाना घेतल्यानंतर पाळीव कुत्र्याच्या लसीकरणावर देता येते लक्ष. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी पालिका पोर्टलवर खालीलप्रमाणे पदपथ अवलंबता येऊ शकतो. पालिका अधिकृत संकेस्थळ - फॉर सिटिझन्सचा पर्याय - अर्ज करावा - परवाना - पाळीव कुत्र्यांसाठी परवाना - नूतनीकरणासाठी अर्ज. मदत कक्ष क्रमांक ०२२- २५५६३२८४/ ८५/ ८७/ ८८

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका