Join us

फार्माच्या विद्यार्थ्यांचा महोत्सव

By admin | Published: January 28, 2017 3:11 AM

फार्मसी शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी राज्य स्तरावर ‘आरएक्स’ या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते.

मुंबई : फार्मसी शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी राज्य स्तरावर ‘आरएक्स’ या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदा हा फेस्टिव्हल मुंबईत पार पडला. एक आठवडा चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी दरवर्षी द इंडियन फार्मास्युटिक असोसिएशनतर्फे या फेस्टचे आयोजन करण्यात येते. यंदा बॉम्बे फार्मास्युटिकल विभागातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आरएक्स’ फेस्टिव्हल यंदा एक आठवडा साजरा झाला. या फेस्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या फेस्टमध्ये शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. यंदाच्या फेस्टचे एक वैशिष्ट्य म्हणजे फार्मास्युटिकल अभ्यासक्रमात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या तिन्ही विद्यार्थिनी या एसएनडीटी विद्यापीठाच्या होत्या. विद्यार्थ्यांना एकत्र आणणे हा या फेस्टचा हेतू आहे. पण फक्त मजा-मस्तीसाठी नाही तर फार्मास्युटिकलच्या क्षेत्रात काय घडत आहे याची अद्ययावत माहिती त्यांना असावी हादेखील त्यामागचा हेतू आहे. सध्या या क्षेत्रात सुरू असणाऱ्या घडामोडी, तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना कळाव्यात म्हणून या फेस्टचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती असोसिएशनचे डॉ. प्रेमराज बट्टलवार यांनी दिली. (प्रतिनिधी)