फार्मासिस्ट बनला ड्रग्ज सप्लायर

By admin | Published: January 13, 2017 04:45 AM2017-01-13T04:45:11+5:302017-01-13T04:45:11+5:30

फार्मासिस्ट बनण्यासाठी बी.फार्मचे शिक्षण पूर्ण केले. बड्या फार्मास्युटिकल कंपनीत रूजू झाला

Pharmacist Drugs Supplier | फार्मासिस्ट बनला ड्रग्ज सप्लायर

फार्मासिस्ट बनला ड्रग्ज सप्लायर

Next

मुंबई : फार्मासिस्ट बनण्यासाठी बी.फार्मचे शिक्षण पूर्ण केले. बड्या फार्मास्युटिकल कंपनीत रूजू झाला. मात्र, वर्षभरापूर्वी नोकरी सुटली. मेहनतीने शिक्षण पूर्ण करून हाती काहीच न लागल्याने, या तरुणाने ड्रग्जचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक माहिती २ कोटीच्या एमडीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रवीण वाघेलाच्या चौकशीत समोर आली. शास्त्रज्ञाच्या मदतीने त्याने कर्नाटक येथे एमडी बनविण्याची फॅक्टरी सुरू केली होती. येथूनच एमडीचा मुंबईसह राज्यभरात पुरवठा केला जात होता.
मूळचा गुजरातचा रहिवासी असलेला ३४ वर्षांचा वाघेला खेरवाडी येथील रहिवासी आहे. बी.फार्मचे शिक्षण पूर्ण करून तो एका फार्मास्युटिकल कंपनीत फार्मासिस्ट म्हणून रूजू झाला. औषध बनविण्यात तो मास्टर होता. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, वर्षभरापूर्वी त्याची नोकरी सुटली. पुढे काय करायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने एका शास्त्रज्ञाची मदत घेतली. याच कालावधीत एमडीने डोके वर काढले होते. त्यातच मार्च महिन्यात एमडीची नोंद अंमली पदार्थामध्ये करण्यात आली. त्यामुळे बाजारात एमडीचा भाव वाढला. अशात एमडी कसे तयार होते, याची माहिती त्याला होती. शास्त्रज्ञाने कर्नाटकच्या जिल्हा हावेरी येथील हनगल गावातील जागा दाखविली. तेथेच त्यांनी फॅक्टरी सुरू केली. याच फॅक्टरीतून एमडी बनविण्यास सुरुवात केली. येथूनच तयार होणार एमडीचा मुंबईसह राज्यभरात पुरवठा केला जात होता. घाटकोपरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिताफीने मुंबई ते कर्नाटक कनेक्शनचा शोध घेतला. सहायक पोलीस आयुक्त मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, अनिल वाढवणे यांच्या तपास पथकाने अधिक तपास सुरू केला. त्यांनी या फक्टरीवर छापा टाकून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. फॅक्टरीतून १ हजार लीटरचे रासायनिक द्रव्य पदार्थ, २६१ किलो ब्रोमीन द्रव पदार्थ , १४ लीटर रासायनिक द्रव्य पदार्थ, ७ किलो पावडर हे पदार्थ जप्त करण्यात आली आहे. तपास सुरू असल्याने, अटक करण्यात आलेल्या अन्य साथीदाराची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मांडगे यांनी दिली. (प्रतिनिधी)

जप्त केलेल्या कारची आॅनलाइन खरेदी
९ जानेवारी रोजी २ कोटींच्या एमडीसह वाघेलाला अटक केली होती. त्याच वेळी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली होंडा सिविक कार त्याने आॅनलाईन खरेदी केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
साथीदारांचा शोध सुरू
या धंद्यात त्याच्यासह आणखीन तीन ते चार जणांचा सहभाग आहे. तो ज्या फार्मास्युटिकल कंपनीत काम करत होता. हे आरोपी तेथीलच कर्मचारी असल्याचा संशय आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Pharmacist Drugs Supplier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.