Join us

फार्मसी महाविद्यालयांना मिळेना यंदा विद्यार्थी; राज्यातील तब्बल १६ हजार जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:22 IST

अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या निम्मेही विद्यार्थी मिळाले नसल्याची स्थिती आहे. 

अमर शैला

मुंबई : राज्यात बी. फार्मसी महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढल्याने, यंदाही या अभ्यासक्रमाच्या तब्बल १६,१६९ म्हणजे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यातून अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या निम्मेही विद्यार्थी मिळाले नसल्याची स्थिती आहे. 

राज्यात यंदा या अभ्यासक्रमाच्या ६१ नव्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली. त्यामुळे महाविद्यालयांची संख्या ५१४ झाली. गेल्यावर्षी राज्यात ४५३ महाविद्यालये होती. त्यामुळे गेल्या वर्षी असलेल्या ४२,७९४ जागांची संख्या यंदा ५०,१७९ इतकी झाली. यात ३४,०१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, १६,१६९ जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीच्या तुलनेत बी. फार्मसीच्या जागांमध्ये भरमसाठ वाढ, यामुळे जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढत आहे. यंदा विविध कारणांमुळे फार्मसी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया लांबली. अखेर २३ डिसेंबरला ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र या प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे रिक्त जागांची संख्या वाढल्याचे आता शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

दोन वर्षांत ११८ नवी महाविद्यालये

 दोन वर्षात बी. फार्मसीची ११८ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात राज्यात फार्मसी अभ्यासक्रमाची ३९६ महाविद्यालये होती. 

यंदा ही संख्या ५१४ वर पोहोचली आहे. त्यातून या अभ्यासक्रमाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या जागा ३६,८८८ वरून ५०,१७९ पर्यंत पोहोचल्या आहेत.

फार्मसी कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेला भरपूर विलंब झाला. त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. यापुढील प्रवेश प्रक्रियेत ३० जूनपर्यंत मान्यता मिळणाऱ्या कॉलेजांचाच समावेश करावा. - प्रा. मिलिंद उमेकर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय फार्मसी शिक्षक संघटना. 

टॅग्स :महाराष्ट्रवैद्यकीय