समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; लवकरच लोकार्पण होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:16 PM2022-10-27T14:16:22+5:302022-10-27T14:20:01+5:30
मुंबईत ३३७ कि.मी. लांबीचे मेट्रो मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल लोकांना मोठा दिलासा मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मुंबई- विकास कामांना गती आली आहे. थांबलेलं चक्र पुन्हा वेगानं फिरू लागलं आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलाय. परिस्थिती बदलत आहे. महाराष्ट्राकडे सगळेच आशेनं आणि विश्वासानं पाहू लागले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ झटकली जात असल्याने सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतोय, असं एकनाथ शिदेंनी सांगितले. पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांचा कर्ज उभारण्यास परवानगी दिलेली आहे. मुंबई, नागपूर, पुणे मेट्रोची कामे वेगाने सुरु आहे. मुंबईत ३३७ कि.मी. लांबीचे मेट्रो मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल लोकांना मोठा दिलासा मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
'आनंदाचा शिधेचा ७ कोटी लोकांना लाभ झाला'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
केंद्राच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यांमध्ये मित्र ही संस्था आपण स्थापन केली आहे त्यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या कामांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूममधून त्याचे संनियंत्रण केले जात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यावर विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. इतर आवश्यक पायाभूत सुविधांना वेग आला आहे. सगळ्या क्षेत्रात, आघाड्यांवर विकास कामाचा धडाका सुरू आहे. कुठलेही काम थांबवले नाही. वित्तीय बाबीं तपासून अनेक कामांना परवानगी तात्काळ दिल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
कृषी सिंचन पायाभूत सुविधा उद्योग पर्यटन आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय विकास कामे योजना प्रकल्प यामध्ये सर्व सामान्यांच्या अशा आकांक्षा यांचा प्रतिबिंब उमटेल यावर आमचा भर आहे. विदेशी गुंतवणूक आणि व्यापार – उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल ही आमची मनोकामना आहे. यासाठी आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे. त्याला आपण साथ देत आहातच. ही साथ कायम राहील. हे नातं घट्ट आणि बळकट होईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केला. जनतेच्या मनातील प्रश्न, अडीअडचणी आणि भावना समजून घेऊन पुढे जाणारं आमचं सरकार असून त्यासाठी अहोरात्र काम करण्याची, जनतेत जाऊन, त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दीपावली पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील जनतेशी संवाद... https://t.co/9NlI4oVnZh
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 26, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"