पत्नीचा शोधनिबंध चोरून मिळविली पीएच.डी, एम.फिल; राज्यपालांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:33 AM2018-03-04T04:33:34+5:302018-03-04T06:16:19+5:30
मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी संचालकाने पत्नीच्या एम.फिल शोधनिबंधातील मजकूर चोरून, त्यावर आधी पीएच.डी व नंतर त्याच पीएच.डीच्या वाङमयावर एम.फिल पदवी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
- योगेश बिडवई
मुंबई : मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी संचालकाने पत्नीच्या एम.फिल शोधनिबंधातील मजकूर चोरून, त्यावर आधी पीएच.डी व नंतर त्याच पीएच.डीच्या वाङमयावर एम.फिल पदवी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या वाङमयचौर्याची तक्रार एका महिला प्राध्यापिकेने राज्यपालांकडे केली असून, सर्व पुरावे सादर केले आहेत. त्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती राज्यपालांकडे केली आहे.
तक्रारीनंतर राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार चौकशी समिती स्थापन झाली. मात्र, समितीचा अहवाल सादर करण्यात विद्यापीठाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे प्राध्यापिकेचे म्हणणे आहे. वाङमयचौर्याची सर्व कागदपत्रे ‘लोकमत’ला मिळाली आहेत.
अर्थशास्त्र विभागातील (मुंबई स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी- विभागाचे झालेले नामकरण) डॉ. नीरज हातेकर यांनी पीएच.डीच्या ‘स्टडिज इन दी थिअरी बिझनेस सायकल्स’ शोधनिबंधात स्वत:च्या पत्नी प्रा. रजनी माथूर यांच्या एम.फिलच्या ‘रॅशनल एक्स्पेक्टेशन मॅक्रोइकॉनॉमिक्स अँड पॉलिसी’ या शोधनिबंधातून अनेक पाने व त्यातील शब्द अन् शब्द चोरून वापरले आहेत. प्रा. माथूर यांनी मे १९९३ मध्ये, तर त्यानंतर डॉ. हातेकर यांनी डिसेंबर १९९३ मध्ये त्यांचा शोधनिबंध सादर केला, असे तक्रारीत नमूद आहे.
- डॉ. आर. के. चौहान समितीने वाङ्मयचोरीचा अहवाल विद्यापीठाकडे दिल्याची माहिती एका सदस्याने दिली. त्यात डॉ. हातेकर यांच्यावर ठपका ठेवल्याचे कळते. राज्यपाल कार्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाने मात्र असा अहवाल आपणाकडे आला नसल्याचे सांगितले.