- राहुल रनाळकरमुंबई : राज्यसभेत १८ वर्षे खासदार म्हणून कारकीर्द भूषविणारे ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या संसदीय कारकिर्दीवर अमरावती विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक रमेश महादेव नगराळे यांनी पीएच.डी. मिळविली आहे.‘विजय दर्डा यांच्या राज्यसभेमधील कामकाजातील सहभागाचे विश्लेषणात्मक अध्ययन’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. वरिष्ठ संशोधक म्हणून रमेश नगराळे यांना यूजीसीने मान्यता दिली होती. नगराळे यांचे मार्गदर्शक डॉ. वामन गवई हे राज्यशास्त्रासह आंबेडकर तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. आंतरविद्याशाखीय ख्यातप्राप्त डॉ. गवई यांनी समाज विज्ञान शाखेतील अनेक संशोधकांना संशोधनात मोलाचे मार्गदर्शन सहाय्य केले आहे.विजय दर्डा यांच्या राज्यसभेतील कामकाजाच्या सहभागाविषयी संशोधन करताना अनेक महत्त्वपूर्ण पैलू समोर आले आहेत. त्यात महाराष्ट्रासह, विदर्भातील सामान्यजनांच्या अनेक प्रश्नांना संसदेच्या पटलावर मांडण्याचे कार्य आपल्या १८ वर्षांच्या दीर्घ संसदीय कारकीर्दीत विजय दर्डा यांनी केल्याचे संशोधनात अधोरेखीत झाले. इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग या तीन पंतप्रधानांच्या कार्यकाळात दर्डा यांनी खासदार म्हणून कार्य केले. याशिवाय संसदेच्या विविध समित्यांवरीलही त्यांचे कार्य देखील अत्यंत उल्लेखनीय असून या सर्वांचे शास्त्रोक्त पद्धतीने संशोधन करुन संशोधकाने निष्कर्ष मांडलेले आहेत.विजय दर्डा यांचे राज्यसभेत २१०० प्रश्नविजय दर्डा यांनी १८ वर्षांच्या दीर्घ संसदीय कारकिर्दीत २१०० हून अधिक प्रश्न उपस्थित केले. पैकी त्यांनी राज्यसभेत विचारलेल्या १४४२ प्रश्नांचा समावेश प्रस्तुत संशोधनात करण्यात आला आहे.या प्रश्नांची विभागणी आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरण आणि विज्ञान अशा विभागांमध्ये संशोधक रमेश नगराळे यांनी केलेली आहे.बहुआयामी संसदीय व्यक्तिमत्त्व- आर्थिक, कृषी, वित्तीय सुधार, अनुसूचित जाती-जमातींसाठीचा विकास निधी, ग्रामीण क्षेत्रातील अल्प भूधारकांच्या समस्या, मागास तसेच अतिमागास क्षेत्रात बँक सुविधा पोहोचवणे, विनिमय दर स्थिरीकरण, सर्वसामान्यांसाठीच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणे, विकास दर संदर्भातील प्रश्न, कायदा आणि न्यायासंदर्भातील जनतेचे प्रश्न, जलसंधारणाचे विषय, बालगुन्हेगारीसारखे सामाजिक न्यायाचे प्रश्न, अपंग, अनाथ, वृद्ध, निराधार यांच्यासाठी सरकारने करावयाचे प्रयत्न, विद्यार्थ्यांचे-दिव्यांगांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न, महिला बाल-कल्याणासंदर्भातील प्रश्नासह आरोग्य आणि कुटुंब कल्याणाचे प्रश्न विजय दर्डा यांनी वेळोवेळी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.- हे प्रश्न संसदेत उचलून धरण्यासोबतच वृत्तपत्रासारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाद्वारे जनसमर्थन पत्रकारितेचेही अद्वितीय उदाहरण निर्माण केल्याचे प्रस्तुत संशोधनातून समोर आले आहे. राज्यासह विदर्भाच्या विकासाबाबतचे अनेक मुद्दे दर्डा यांनी राज्यसभेत उचलून धरले. त्यात विदर्भातील रेल्वेच्या प्रश्नांचाही समावेश आहे. ग्रामीण विकासासह नागरी विकास, मानव संसाधन आणि अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांचाही सातत्याने पाठपुरावा केल्याचे अधोरेखीत झाल्याने विजय दर्डा यांच्या बहुआयामी संसदीय व्यक्तिमत्त्वावर या अमूल्य संशोधनाद्वारे एकप्रकारे मोहोर उमटली आहे.
विजय दर्डा यांच्या संसदीय कार्यावर पीएच.डी., अमरावती विद्यापीठात नगराळे यांचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:52 AM