Join us

उत्सवातून ‘हिंदू-मुस्लीम ऐक्या’चे दर्शन

By admin | Published: August 29, 2016 5:25 AM

गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांमध्ये गणेशमूर्तींचे स्वरूप पालटत असताना शाडूच्या मातीची जागा पीओपीने घेतली आहे.

मुंबई : गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांमध्ये गणेशमूर्तींचे स्वरूप पालटत असताना शाडूच्या मातीची जागा पीओपीने घेतली आहे. पण, निसर्गाचे भान राखत अखिल मुगभाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अजूनही शाडूच्या मातीचीच गणेशमूर्ती बनवतात. तर, या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मुस्लीम बांधव गणपतीला सलामी देतात, हे या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. गिरगावच्या महाराजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शेकडो भाविक दरवर्षी गर्दी करतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या ठिकाणी ‘हिंदू-मुस्लीम ऐक्या’चे दर्शन होते. अनेकदा हिंदू-मुस्लीम वाद होत असतात; पण ‘गिरगावचा महाराजा’ हा त्याला अपवाद असल्याचे मत मंडळाचे अध्यक्ष नीलेश अहिरेकर यांनी सांगितले. गिरगावच्या महाराजाची विसर्जन मिरवणूक गिरगावातून फिरून सी.पी. टँक भागात जाते. या भागात मिरवणूक पोहोचल्यावर या ठिकाणी गणपतीची विसर्जन मिरवणूक थांबते. या वेळी मुस्लीम बांधव गणपतीला हार घालून, आरती ओवाळून स्वागत करतात. त्यानंतर पुन्हा महाराजाची मिरवणूक सुरू होत असल्याची माहिती अहिरेकर यांनी दिली. गिरगावच्या महाराजाची गणेशमूर्ती ही २१ फूट उंचीची असते. विविध रूपातील गणेशमूर्ती हे मंडळ गेल्या ८५ वर्षांपासून साकारत आहे. गिरगावकरांना विविध रूपातील, देशांतील गणेशाच्या रूपांचे दर्शन व्हावे हा यामागील हेतू आहे. तरीही पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार हे मंडळ शाडूच्या मातीची गणेशमूर्ती साकारते. २१ फूट उंच असली तरीही प्लॅस्टर आॅफ पॅरिस वापरून प्रदूषण करणे योग्य वाटत नसल्याने नवीन पिढीनेही शाडूच्या मातीचा गणपती करण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे सचिव केतन मदन यांनी सांगितले.सामाजिक कार्यात सहभागमंडळाचे पदाधिकारी नेहमीच सर्वांच्या मदतीस तत्पर असतात. २६ जुलैला मुंबईत आलेल्या महापुरात घटनास्थळी जाऊन कार्यकर्त्यांनी मुंबईकरांना मदत केली होती. पंचरत्न येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर कार्यकर्ते जखमींच्या मदतीला गेले होते. अध्यक्षांनी रुग्णवाहिका चालवत जखमींना रुग्णालयात नेले होते. गणेशोत्सवादरम्यान मंडळातर्फे धार्मिक कार्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये श्रीगणेशयाग, सहस्रावर्तने, भजन, सत्यनारायणाची पूजा असे कार्यक्रम केले जातात. गिरगावचा महाराजा मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप केले जाते. रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर महिलांसाठी खास अन्नकोट स्पर्धेचे आयोजन केले जाते. ‘महाराजा चषक’ या स्पर्धेचेही आयोजन केले जाते. (प्रतिनिधी)