Join us

ताज हॉटेलमध्ये दहशतवादी घुसल्याचा फोन, मुलाची गंमत, पोलिसांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 8:51 AM

फोन करून मुंबईतील ‘ताज’मध्ये अतिरेकी घुसल्याची पसरवली अफवा

ठळक मुद्देहॉटेल प्रशासनाने फोन बाबतची माहिती दिल्यानंतर कुलाबा पोलिसांनी कऱ्हाड पोलिसांना सांगितले. कऱ्हाड शहर पोलिसांनी ज्या मोबाइलवरून फोन आला त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो मोबाइल हा त्याचा मुलगा वापरत असल्याचे समजले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/कऱ्हाड : हॉटेल ताजमध्ये शनिवारी आलेल्या एका अफवेच्या फोनमुळे हॉटेल प्रशासन व तेथील सुरक्षा यंत्रणांची काही काळ धावपळ उडाली. फोननंतर पोलिसांनी परिसर धुंडाळून काढला. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही.

दुपारी ३.३० च्या सुमारास मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोबाइलवरून कॉल करून ‘हॉटेलच्या पाठीमागच्या दरवाजातून दोन अतिरेकी एके ४७ रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ अशी माहिती देऊन खळबळ उडवणारा मुलगा हा अल्पवयीन असून, गंमत म्हणूनच त्याने हा फोन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की, कऱ्हाडमधील नववीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने हा दूरध्वनी केला होता.

हॉटेल प्रशासनाने फोन बाबतची माहिती दिल्यानंतर कुलाबा पोलिसांनी कऱ्हाड पोलिसांना सांगितले. कऱ्हाड शहर पोलिसांनी ज्या मोबाइलवरून फोन आला त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो मोबाइल हा त्याचा मुलगा वापरत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मुलाकडे चौकशी केल्यावर त्याने गंमत म्हणून फोन केल्याचे सांगितले.

शूटआउट अ‍ॅट वडाळा, २६/११ यांसारख्या चित्रपटांचा प्रभाव माझ्यावर असल्याचे संबंधित मुलाने सांगितले. त्याचा समाजविघातक घटनांशी कुठलाही संबंध दिसून येत नाही. केवळ गंमत म्हणून त्याने हा कॉल केला होता.     - बी. आर. पाटील, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमुंबई